ताशिलदार गल्लीत फ्लॅट फोडला
वीस मिनिटांमध्ये सुमारे तीन लाखांची घरफोडी
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या व घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. ताशिलदार गल्ली येथील एका फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून सुमारे 3 लाखांचे दागिने पळविले आहेत. शुक्रवारी दुपारी 2.20 ते 2.40 या वीस मिनिटांच्या काळात चोरीची ही घटना घडली असून परिसरात खळबळ माजली आहे. ताशिलदार गल्ली येथील वीरमा राम यांच्या घरी चोरी झाली आहे. वीरमा राम यांचे पांगुळ गल्ली येथे दुकान आहे. शुक्रवार दि. 10 जानेवारी रोजी दुपारी 2.20 वा. त्यांची पत्नी फ्लॅटला कुलूप लावून मुलीला शाळेतून घरी आणण्यासाठी उषाताई गोगटे स्कूलला गेली होती. 2.40 वा. घरी परतली, त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला आहे. कपाट फोडून कपाटातील साडेतीन ग्रॅम सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदीचा कमरपट्टा व ब्रासलेट आदी दागिने पळविले आहेत. हा प्रकार उघडकीस येताच मार्केट पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.
तिघेजण इमारतीत प्रवेश करतानाची छबी कॅमेऱ्यात कैद
मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक हुसेन केरुर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. केवळ वीस मिनिटांत चोरट्यांनी आपला डाव साधला आहे. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फुटेजवरून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. तिघेजण वीरमा राम यांच्या इमारतीत प्रवेश करताना त्यांची छबी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर पुढील तपास करीत आहेत.