For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्वलनशील पेनड्राईव्ह प्रज्ज्वलन!

06:30 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्वलनशील पेनड्राईव्ह प्रज्ज्वलन
Advertisement

देशभरात तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला पोहचला असून पंतप्रधानांसह गृहमंत्री यांच्यासह महनिय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. कर्नाटकातही तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार असून प्रचाराचा धडाका अंतिम टप्प्यात पोहचला आहे. ऐन प्रचारातच हासनचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अश्लील व्हिडिओचे प्रकरण बाहेर पडल्याने राजकीय पक्षांचे याबाबतीत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या प्रकरणाने निवडणुकीतील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

Advertisement

देशभरात तिसऱ्या टप्प्यातील तर कर्नाटकात दुसऱ्या टप्प्याचे मतदान 7 मे रोजी होणार आहे. यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. राजकीय पक्षांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राहुल गांधी आदी राष्ट्रीय नेत्यांच्या जाहीर सभा सुरू आहेत. पंतप्रधानांनी तर कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. राजकीय पक्षांचे हल्ले-प्रतिहल्ले सुरू असतानाच आणखी एक प्रकरण केवळ कर्नाटकातच नव्हे तर देशभरात ठळक चर्चेत आले आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू, माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांचे चिरंजीव व हासनचे विद्यमान खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांचे अश्लील व्हिडिओ उघड झाल्यानंतर निजदच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्नाटकातील पहिल्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल रोजी झाले. त्याच्या आधीच प्रज्ज्वल ज्या हासन मतदारसंघातून लोकसभा रिंगणात आहेत, त्या मतदारसंघात अश्लील चित्रफितींचे पेनड्राईव्ह वाटण्यात आले. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

दक्षिणेत वक्कलिग समाजाचे प्राबल्य आहे. या समाजावर अधिराज्य कोण गाजवणार? या विषयावरून अधूनमधून राजकीय संघर्ष होत असतो. सध्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यात तो संघर्ष सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी निजदने भाजपशी युती केली. जागावाटपात 28 पैकी निजदला 3 जागा देण्यात आल्या आहेत. प्रज्ज्वल रेवण्णा हे भाजप-निजद युतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भाजपचे अनेक मातब्बर नेते कर्नाटकात आले. आता पेनड्राईव्ह प्रकरणावरून साऱ्यांनाच धक्का बसला आहे. त्या पेनड्राईव्हमध्ये एक-दोन नव्हे तर 2 हजार 800 हून अधिक अश्लील चित्रफिती असल्याची माहिती आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी बी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीअंतीच बऱ्याच मुद्द्यांवर प्रकाश पडणार आहे. पेनड्राईव्ह वाटपानंतर लगेच माजी मंत्री व होळेनरसीपूरचे विद्यमान आमदार एच. डी. रेवण्णा यांचे चिरंजीव खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यावर एफआयआरही दाखल झाला आहे. त्यांच्या घरी याआधी काम करणाऱ्या मोलकरणीने या पिता-पुत्रांकडून आपली व आपल्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement

काँग्रेसने संपूर्ण राज्यात या अश्लील पेनड्राईव्ह प्रकरणी आंदोलन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या नेत्यांनी आपल्या मित्रपक्षाच्या खासदाराने दाखवलेल्या कर्तृत्वाबद्दल आपले मत व्यक्त करण्याची मागणी प्रियांका गांधी यांनी जाहीर सभेत केली होती. त्यानंतर लगेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आहे. कारवाईसाठी अद्याप वेळ लागतो आहे, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याबाबतीत प्रसारमाध्यमांमध्ये जे काही छापून येत आहे, टीव्हीवर जे दाखवले जात आहे, त्याचे कोणीच समर्थन करणार नाही. भाजपला तर मुळीच हे मान्य नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, कारवाईसाठी विलंब का? असा प्रश्न अमित शहा यांनी उपस्थित केला आहे. माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही आपल्या बदनाम पुतण्यापासून अंतर राखण्याचे ठरविले आहे. एच. डी. रेवण्णा व आपण वेगळे राहतो. त्यांच्या घरात काय झाले आहे? याच्याशी आपले देणे-घेणे नाही. ते प्रकरणच समर्थन करण्यासारखे नाही. त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी भूमिका घेत या पेनड्राईव्ह प्रकरणात कर्नाटकातील महानेत्याचा हात आहे, असे सांगत डी. के. शिवकुमार यांच्याकडे बोट दाखवले आहे.

केवळ कर्नाटकातच नव्हे तर देशभरात बदनामी होताच हुबळी येथे झालेल्या निजदच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रज्ज्वलवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला. त्याला पक्षातून हाकलण्यात आले आहे. अश्लील पेनड्राईव्ह प्रकरणावरून कर्नाटकातील राजकारण ढवळून निघाले आहे. ऐन निवडणूक प्रचारात हा घ्रृणास्पद प्रकार सामोरा आल्यानंतर महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. खासदार प्रज्ज्वल रेवण्णा हे अविवाहित आहेत. त्यांनी शेकडो महिलांशी केलेले अश्लील चाळे आपल्याच मोबाईलमध्ये चित्रित केले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आलेले व्हिडिओ बाहेर कसे पडले? याचाही शोध घेतला जात आहे. जर सारथीने दगा दिला तर सेनापतीला युद्ध जिंकता येत नाही. या प्रकरणातही प्रज्ज्वलच्या कारचालकावर संशय बळावला आहे. एक वर्षापूर्वीच नोकरी सोडलेल्या कार्तिक या कारचालकाची जमीन प्रज्ज्वल कुटुंबीयांनी लिहून घेतली होती. त्याच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली होती. त्याचा राग मनात ठेवून कार्तिकने प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडिओ हासनमधील भाजपचे नेते देवराजे गौडा यांच्याकडे दिले होते, अशी माहिती सामोरी आली आहे.

मतदानाला एक-दोन दिवस शिल्लक असताना अश्लील व्हिडिओचा पेनड्राईव्ह मतदारसंघातील अनेक गावात कोणी पोहोचविले? पेनड्राईव्ह पोहोचवताना व्हिडिओतील महिलांचे काय होईल? याचा विचार कोणीच केला नाही. पेनड्राईव्हमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर बाहेर पडलेले व्हिडिओ काही नवे नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून या व्हिडिओची अधूनमधून चर्चा होतच होती. त्यामुळेच प्रज्ज्वल रेवण्णा यांनी आपल्यासंबंधीचे व्हिडिओ कोणीही प्रदर्शित करू नये, यासाठी न्यायालयातून स्थगिती मिळविली होती. कर्नाटकातील राजकीय नेत्यांपैकी अनेकांनी न्यायालयातून मनाई मिळवली आहे. आपल्यासंबंधीचे व्हिडिओ व्हायरल होणार, याची भीती सर्वच राजकीय पक्षातील अनेक नेत्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी न्यायालयातून मनाई घेतली आहे. प्रज्ज्वलचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या चिरंजीवांनीही न्यायालयातून मनाई घेतली आहे. राज्य व राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पेनड्राईव्ह प्रकरण बाहेर पडल्यानंतर प्रज्ज्वल जर्मनीला पळाला आहे. याच आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात ते बेंगळुरात परततील, असे सांगितले जात आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी संघर्षातून कर्नाटकाच्या व देशाच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या कुलदीपकाने केलेल्या कृत्यामुळे त्यांनाही शरमेने मान खाली घालावी लागली आहे. या प्रकरणावरून डी. के. शिवकुमार व एच. डी. कुमारस्वामी यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. भविष्यात हा संघर्ष कोणते वळण घेतो? हे पहावे लागणार आहे.

-रमेश हिरेमठ

Advertisement
Tags :

.