For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव विमानतळाचा देशात झेंडा

10:41 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव विमानतळाचा देशात झेंडा
Advertisement

ग्राहक समाधान यादीत पटकाविला चौथा क्रमांक : 33 निकषांवर क्रमवारी निश्चित

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळावर उत्तम दर्जाच्या सेवा दिल्या जात असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच नुकत्याच जाहीर झालेल्या ग्राहक समाधान क्रमवारीत बेळगाव विमानतळ देशात चौथ्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विमानतळ प्राधिकरणाने नुकतीच यादी जाहीर केली असून त्यामध्ये बेळगाव विमानतळ चौथ्या स्थानी असल्याने समाधान व्यक्त होत आहे. विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सुविधांचा विचार करून ग्राहक समाधान यादी तयार केली जाते. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून 33 निकषांवर क्रमवारी निश्चित करण्यात आली. विमानतळावरील पार्किंगची व्यवस्था, प्रवाशांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा, बॅगेजची ट्रॉली, चेक इनसाठी लागणारा कालावधी, सिक्युरिटी इन्स्पेक्शन, उपलब्ध खाद्यपदार्थ, इंटरनेट व वायफायची व्यवस्था या सर्व बाबींचा विचार करण्यात आला. ग्राहकांकडून मागवलेले अभिप्राय तसेच अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणामधून 2023 मध्ये ग्राहक समाधान यादी तयार करण्यात आली. यामध्ये बेळगावला 4.97 गुण देण्यात आले आहेत. तर हुबळीला 4.95 इतके गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगाव विमानतळ देशात चौथ्या स्थानी आले आहे. त्यापाठोपाठ हुबळी विमानतळानेही क्रमांक पटकाविला आहे. कर्नाटकातील म्हैसूर व कलबुर्गी या विमानतळांनी 22 व 29 वे स्थान पटकाविले आहे. देशातील महत्त्वाच्या दहा शहरांना बेळगावमधून विमानसेवा दिली जाते. बेंगळूर, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, सूरत, नागपूर, तिरुपती, जोधपूर व जयपूर या शहरांना सध्या विमानसेवा सुरू आहेत. लवकरच इतर शहरांनाही विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अधिकारीवर्गाकडून विमानतळाचे नेटके व्यवस्थापन केले जात असल्याने प्रवाशांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.