For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टस्कराचा बंदोबस्त करा, अन्यथा मतदानावर बहिष्कार

11:16 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
टस्कराचा बंदोबस्त करा  अन्यथा मतदानावर बहिष्कार
Advertisement

कबनाळी ग्रामस्थांचा इशारा : तीन आठवड्यापासून टस्कराने ठाण मांडल्याने शेतकरी चिंतेत, भातपिकाचे नुकसान

Advertisement

खानापूर : तालुक्यातील कबनाळी-मुगवडे भागात गेल्या तीन आठवड्यापासून एका टस्कर हत्तीने वास्तव्य केले असून या भागातील उन्हाळी भात उद्ध्वस्त करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याबाबत वनाधिकाऱ्यांना हत्तीचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन दिले होते. तसेच आमदार विठ्ठल हलगेकर यांनाही भेटून हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून हत्तीचा बंदोबस्त करण्यात आलेला नसल्याने अखेर कबनाळी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री बैठक घेऊन मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी जलस्त्रोत असल्याने वायंगण भाताची लागवड केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. वायंगण भात पिकासाठी शेतकऱ्यांना बरेच कष्ट उपसावे लागतात. अशा परिस्थितीत भातपीक हातातेंडाशी आले असतानाच गेल्या तीन आठवड्यापासून एका टस्कर हत्तीने या भागात वास्तव्य केले असून शेकडो पोती भातपिकाचे नुकसान या हत्तीने केले आहे. कबनाळी परिसरात नैसर्गिक जलस्त्रोत असल्याने हा हत्ती येथून इतरत्र जाण्यास पहात नसल्याचे दिसून आले आहे. हातातोंडाशी आलेले भातपीक हत्तीच्या हैदोसामुळे नुकसान होत असल्याने येत्या आठ दिवसात हत्तीचा बंदोबस्त केला नसल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे ग्रा. पं. माजी अध्यक्ष राजेश धुरी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

टस्कराला हुसकावण्यासाठी वनखात्याचे जुजबी प्रयत्न

Advertisement

ग्रामस्थांनी मागील आठवड्यात हत्तीचा बंदोबस्त करण्याबाबत वनाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. वनाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना हत्तीला जंगलात घालवण्यासाठी आदेश दिले होते. वन कर्मचाऱ्यांनी या हत्तीला जंगलात घालवण्यासाठी जुजबी प्रयत्न केल्याने हा हत्ती पुन्हा याच ठिकाणी ठाण मांडून बसला आहे. याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर यांना ग्रामस्थांनी भेटून हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याला सूचना कराव्यात, अशी मागणी केली होती. मात्र आमदारांनी याबाबत गांभीर्याने घेतले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.