हेरॉईन विक्री प्रकरणी अनगोळच्या पाच तरुणांना अटक
कारसह 31 हजाराचे हेरॉईन जप्त, टिळकवाडीचे पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व उपनगरात अमलीपदार्थांची विक्री जोरात सुरू आहे. गांजा, अफीम, ब्राऊनशुगर पाठोपाठ हेरॉईनची विक्री केली जात असून कॉलेज विद्यार्थीच या टोळीचे गिऱ्हाईक आहेत. हेरॉईन विक्रीच्या आरोपावरून टिळकवाडी पोलिसांनी शनिवारी दुपारी अनगोळ येथील पाच तरुणांना अटक केली आहे.
प्रफुल्ल गजानन पाटील (वय 25), सुशांत गोविंद कंग्राळकर (वय 26) दोघेही रा. रघुनाथ पेठ, अनगोळ, नारायण बाबुराव पाटील (वय 22) रा. मेन रोड, अनगोळ, सुनील भैरू असलकर (वय 25) रा. भांदूर गल्ली, अनगोळ, सलमान बब्बर मोकाशी (वय 24) रा. कुरबर गल्ली, अनगोळ अशी त्यांची नावे आहेत.
टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी, उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास रानडे कॉलनी परिसरातील एका मेसजवळ या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 31 हजार 500 रुपये किमतीचे 5 ग्रॅम 150 मिली हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
अनगोळ परिसरातील काही तरुण अमलीपदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या तरुणांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. शनिवारी दुपारी आरपीडी कॉलेज हॉस्टेलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या रानडे कॉलनी परिसरात या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ हेरॉईन असल्याचे आढळून आले.
या पाच जणांजवळ एका कागदात बांधलेले हेरॉईन जप्त करण्यात आले. त्यांच्याजवळून जीए 08 के 1283 क्रमांकाची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली असून या तरुणांनी हेरॉईन कुठून मागवले? याची चौकशी करण्यात येत आहे. बेळगाव शहर व उपनगरात उघडपणे अमलीपदार्थांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी अमलीपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली असून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.