म्हादई अभयारण्यात पाच वाघांचा वावर
म्हादई अभयारण्यातील वाघ हे स्थानिकच : सरकारकडून मात्र माहिती लपविण्याचा प्रयत्न
डिचोली : गोवा सरकार सांगत होते की, म्हादई अभयारण्यात वाघ नाहीत. जे आढळतात ते कर्नाटक किंवा महाराष्ट्रातून येतात. पण आज कर्नाटक व महाराष्ट्र सरकारने केलेल्या संशोधनात गोव्यात आढळणारे पाच वाघ हे गोव्याच्या जंगलातीलच स्थानिक असून त्यांचा जन्म हा म्हादई अभयारण्यातीलच आहेत, हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पर्यावरणवादी प्रा. राजेंद्र केरकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. म्हादई अभयारण्यात जन्माला आलेल्या वाघ व वाघिणीचा वावर सध्या या जंगलात पहायला मिळत आहे. काहीवेळा अन्न व इतर गरजांसाठी हे वाघ तिळारीपर्यंत किंवा काळी व्याघ्रक्षेत्रापर्यंत जाताना पहायला मिळतात. तसेच कोयना जवळील सह्याद्री व्याघ्र संरक्षण क्षेत्रात त्यांचा वावर अनेकदा पॅमेरा ट्रॅपच्या सहाय्याने आढळून आलेला आहे. प्राणी शास्त्र अभ्यासक, संशोधक गिरीश पंजाबी यांनी हल्लीच एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार गोव्यात पाच वाघ असल्याचे सिद्ध झाले आहे. आता हे वाघ गोव्याचे निवासी, महाराष्ट्र किंवा कर्नाटकाचे निवासी वाघ आहे, असा समज करणे अत्यंत चुकीचे ठरणार. याचा फरकही करू शकत नाही. वाघाला सुरक्षित नैसर्गिक अधिवास गरजेचा असतो. व ज्या भागात त्याला सुरक्षित वाटते तेथेच तो राहतो, असे केरकर म्हणाले.
... तरीही वाघ गोव्याच्या जंगलातच
यापूर्वी गोव्यात जंगले जाळून टाकण्याचे षड्यंत्र सुरू होते तेव्हा गोव्यातील काही वाघ तिळारी किंवा काळी व्याघ्र क्षेत्रात गेले होते. पण आता हे वाघ पुन्हा गोव्याच्या जंगलात आलेले आहेत. कारण केंद्र सरकारने याची दखल घेऊन गोवा सरकारच्या वनखात्याचे कान टोचले आहे. त्यासाठी वाघांसाठी हा भाग सुरक्षित व्हावा यासाठी उपाययोजना करण्याची सक्ती करण्यास बजावले आहे. त्यामुळे आता हे वाघ पुन्हा गोव्यातील जंगलात येत असल्याने पॅमेरा ट्रॅपमध्ये बंदीस्त होत आहेत. परंतु ही माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये याची काळजी सरकार घेत आहे.
या परिसरात भ्रमंती करतेवेळी वाघांचे अस्तित्व निदर्शनास येते. अंजुणे धरणाच्या जलाशयात वाघांचा वावर आहे. वाघ चोर्ला घाटातील पणसुली गावात येतात याचेही पुरावे सापडले आहेत. गोवा सरकारने अभयारण्य क्षेत्रात जे ‘वॉच टॉवर’ उभारले आहेत, ‘अँटी पोचिंग स्कॉड’ नियुक्त केलेले आहे. या माध्यमातूनही म्हादई अभयारण्यात वाघांचा वावर वारंवार आढळून येतो. पण या बाबी उघड होऊ नये यासाठी सरकारतर्फे त्या भागातील संबंधीत अधिकाऱ्यांवर दबाव आणून अडथळा निर्माण केला जातो. त्यामुळे वाघांच्या वावराच्या संदर्भात संशोधन करण्याच्या दृष्टीने गोवा वनखात्याचा कारभार शून्य असल्याचे दिसून येते.
गोवा सरकारने वाघांच्या अस्तित्वाबाबतच्या संशोधनासाठी डॉ. उल्हास कारंथ यांना नियुक्त केले होते. डॉ. उल्हास कारंथ यांनी एकंदर गोव्याच्या जंगलात म्हणजेच म्हादई अभयारण्यात असलेल्या ‘म्हावळंगीचे पाणी’ या भागात वाघाचा फोटो मिळविला होता. त्याचा अभ्यास केल्यानंतर कळून आले होते की फोटोत आढळून आलेला वाघ ही मादी होती व तिने एका रानडुकराला ठार केले होते व त्याचे मांस ती खात होती. त्याचा पहिला फोटो सहाय्यक वनपाल असलेल्या परेश पोरोब यांच्याकडे होता. त्यांच्याच अथक परिश्र्रमानंतर गोव्यातील वाघांच्या अस्तित्वाबाबत जाणीव झाली होती. पण याचा पुढील अभ्यास व्हावा यासाठी डॉ. उल्हास कारंथ मागणी करत होते, परंतु गोवा सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही आणि यावर संशोधन करण्याचे कार्य स्थगित झाले होते, अशी माहिती प्रा. राजेंद्र केरकर यांनी दिली.
हल्लीच अंजुणे धरण परिसरात आम्ही भ्रमंती केली असता वाघाची ‘विष्ठा’ आढळून आली आहे. तसेच अंजुणे धरण व चोर्ला घाटात अनेकवेळा ट्रक चालकांना वाघ दृष्टीस पडलेला आहे. एका भागात तर एक वाघीण तीन बछड्यांसह पॅमेरामध्ये टिपली गेली आहे. चोर्ला घाटातील पणसुलीच्या भागातून कर्नाटकाच्या भागात, तर काहीवेळा महाराष्ट्राच्या भागात जाताना दृष्टीस पडलेला आहे. याचे पुरावे आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे वाघ या स्थानाचा शिखरस्थानावरचा प्राणी आहे. तो ज्याप्रमाणे भीमगड अभयारण्यात, काळी व्याघ्रक्षेत्रात पहायला मिळतो, तसाच तो आम्हाला याही म्हादई अभयारण्यातही पहायला मिळतो, असेही प्रा. राजेंद्र केरकर यांनी सांगितले.