झारखंडमध्ये महिलेसह पाच दहशतवाद्यांना अटक
‘पीएलएफआय’च्या सदस्यांवर पोलिसांची कारवाई
वृत्तसंस्था/ .सिमडेगा
झारखंडमध्ये सिमडेगा पोलिसांनी एका महिलेसह 5 पीएलएफआय संघटनेच्या दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. हे दहशतवादी रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपनीकडून कर वसूल करण्यासाठी आले असता ते सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात अडकले. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून 54 हजार 400 रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी 2 दुचाकी आणि 5 मोबाईल जप्त केले आहेत.
कंपनीच्या लोकांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सराई पानी जंगलात कर वसूल करण्यासाठी आलेल्या सर्व दहशतवाद्यांना अटक केली. पोलिसांनी पकडलेल्या दहशतवाद्यांनी अनेक गुपिते उघड केली आहेत. या करवसुलीमध्ये अन्य काहींचाही समावेश असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. यमुना मिंज असे अटक केलेल्या महिला दहशतवाद्याचे नाव आहे. ती खुंटी जिल्ह्यातील रहिवासी आहे. तसेच आशिष मिंज, सुनील ओरांव, सिद्धांत कुमार आणि राहुल ओरांव अशी अन्य दहशतवाद्यांची ओळख पटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.