For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुलवामात शस्त्रास्त्रांसह पाच दहशतवादी जेरबंद

06:22 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुलवामात शस्त्रास्त्रांसह पाच दहशतवादी जेरबंद
Advertisement

राजौरी, अखनूरमध्येही घुसखोरीचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

पुलवामाच्या अवंतीपोरा येथील पंजगाम परिसरात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. तसेच अनंतनागमध्ये तीन संशयितांना जेरबंद केल्यामुळे दिवसभरात पाच जणांवर कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल, 2 मॅगझिन आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. तसेच लष्कराने रविवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या अखनूर आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दुसऱ्या बाजूने गोळीबार झाला नसला तरी संशयित सीमा ओलांडत असताना लष्कराने गोळीबार केला.

Advertisement

अखनूरच्या बटाल सेक्टरमध्ये 3 ते 4 घुसखोरांच्या संशयास्पद हालचालींनंतर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास लष्कराने गोळीबार केला. परिसरात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ड्रोनच्या साह्याने परिसरावर नजर ठेवली जात आहे. तत्पूर्वी, राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी-नौशेरा सेक्टरमध्ये सकाळी 12.30 वाजता संशयास्पद हालचाली दिसल्या होत्या.

या चकमकीपूर्वी 1 ऑगस्ट रोजी बीएसएफ जवानांनी जम्मू-काश्मीरमधील सांबा जिह्यात भारत-पाकिस्तान सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले. खोरा पोस्टजवळ घुसखोर भारतीय हद्दीत घुसल्याचे दिसल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बीएसएफचे आयजी डी. के. बुरा यांनी सांगितले. बीएसएफ जवानांच्या इशाऱ्यानंतरही घुसखोर थांबला नाही, त्यानंतर झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. घुसखोर भारत-पाकिस्तान सीमेची शून्य रेषा ओलांडत होता. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कर, पोलीस आणि बीएसएफने जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात संयुक्त शोधमोहीम राबवली. यावेळी राजौरी जिल्ह्यातील कालाकोट परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे.

कलम 370 हटवून पाच वर्षे पूर्ण

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवून सोमवारी पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्ती आणि वाहनावर नजर ठेवण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवल्यानंतर राज्याचा विशेष दर्जा संपुष्टात आला होता. तसेच राज्य जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागले गेले.

Advertisement
Tags :

.