नदीत बुडून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू
रामनगर जिल्ह्यातील घटना : बेंगळूरमध्ये शिक्षण घेत होते मृत विद्यार्थी
प्रतिनिधी/ बेंगळूर
नदीत बुडणाऱ्या एकाला वाचविण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना रविवारी रामनगर जिल्ह्यात घडली आहे. रविवारी कॉलेजला सुट्टी असल्याने 12 विद्यार्थी मेकेदाटू येथे फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी एकजण नदीत पोहोण्यासाठी उतरला. तो वाहून जात असल्याने इतर चौघांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याच्या प्रवाहामुळे पाचही जण बुडाले.
वर्षा (वय 20), राजाजीनगरमधील केएलई कॉलेजमध्ये शिकणारा अभिषेक (वय 20), मूळचा बिहार येथील आणि मल्लेश्वरम येथील सरकारी कॉलेजमध्ये शिकणारी एन. एल. हर्षिता (वय 20), मूळचा मंड्या जिल्ह्यातील व चिक्कबाणवार येथील अभियांत्रिकी विद्यार्थी तेजस (वय 21) आणि मूळची चित्रदुर्ग येथील व आर. आर. नगरमधील केएलई कॉलेजमध्ये शिकणारी नेहा (वय 19) यांचा नदीत बुडून मृत्यू झाला.
कनकपूर तालुक्यातील मेकेदाटू येथे नदीच्या संगमावर फिरण्यासाठी आलेल्यांपैकी एक जण नदीत पोहण्यासाठी उतरला. तो बुडत असल्याने त्याला वाचविण्यासाठी अन्य चार सहकाऱ्यांनी नदीत उडी घेतली. मात्र, पाचहीजण बुडाले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढले. कनकपूर ग्रामीण आणि सातनूर स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विद्यासागर हॉस्पिटलला पाठविण्यात आले.