भांबर्डेतील खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेप
विटा :
भांबर्डे येथील २०१६ सालातील खुन खटल्यातील पाच दोषींना मंगळवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विक्रम शिवाजी शिंदे (४०), महेश दिनकर शिंदे (४६), तानाजी पांडुरंग शिंदे (६०), विशाल शिवाजी शिदे (४०, सर्व रा. भांबर्डे, ता. खानापूर), विश्वास गणपतराव भोसले (५०, रा. विटा) अशी त्यांची नावे आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. भागवत यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून आरती देशपांडे साटविलकर यांनी तर आरोपींच्यावतीने प्रमोद सुतार आणि सविता शेडबाळे यांनी काम पाहिले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भांबर्डे (ता.खानापूर) येथे नऊ वर्षांपूर्वी १६ मे २०१६ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास महेश शिंदे यांच्या घरासमोर वाळत टाकलेली साडी फाडल्याच्या कारणावरुन सौ. अक्काताई यादवराव शिंदे, त्यांचा मुलगा दीपक शिंदे आणि लक्ष्मी शिंदे यांच्यात वादावादी झाली होती. मात्र या वादाचा राग मनात धरून विक्रम शिंदे, महेश शिदे, तानाजी शिदे, विशाल शिदे, विश्वास भोसले आणि बाळासाहेब तातोबा शिंदे यांनी बेकायदा जमाव जमवून दिपक शिंदे यास लाथाबुक्कांनी मारहाण करुन जखमी केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या सहाजणांनी मिळून मारहाण करुन संगनमताने आपल्या मुलाचा खून केला, अशी फिर्याद सौ. अक्काताई शिंदे यांनी विटा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे (सध्या पोलीस निरीक्षक कांदिवली, मुंबई) यांनी यातील सर्व सहाही संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. दरम्यानच्या काळात बाळासाहेब तातोबा शिंदे हे मरण पावले.
याप्रकरणी मंगळवारी न्यायालयाने पाच जणांना जन्मठेप व प्रत्येकी ३० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिन्याचा कारावास तसेच ६ महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, शिवाय २ वर्षाची सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली.