For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाच महसूल निरीक्षकांची उचलबांगडी

12:59 PM Apr 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
पाच महसूल निरीक्षकांची उचलबांगडी
Advertisement

महानगरपालिका आयुक्तांची कारवाई : महसूल विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप

Advertisement

बेळगाव : महापालिकेच्या महसूल विभागात कार्यरत असलेल्या पाच महसूल निरीक्षकांची मनपा आयुक्त शुभा बी. यांनी तडकाफडकी बदली केली आहे. मनपा आयुक्तांनी केलेल्या या मेजर सर्जरीमुळे महापालिकेतील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. महसूल विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप करत विरोधी गटाच्यावतीने महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आल्यानंतर आयुक्तांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. पवन देवरवाडी, अमित गंथडे, मल्लिकार्जुन हिरोळ्ळी, संतोष आणि रवी परमेकर अशी बदली करण्यात आलेल्या महसूल निरीक्षकांची नावे आहेत.  महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी अधिकारी तळ ठोकून आहेत. विशेष करून महसूल विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून त्याचा नाहक त्रास बेळगावकरांना सहन करावा लागत आहे. एखाद्या कामासाठी अर्ज केला असता विनाकारण त्या कामाला विलंब लावला जात आहे. अनेक महिने फाईल अधिकाऱ्यांच्या टेबलावरच पडून रहात आहे. नगरसेवकांनाही अधिकारी जुमानत नसल्याने नागरिकांची कामे रेंगाळत आहेत. याबाबत नागरिकांतून असमाधान व्यक्त केले जात आहे. त्याचबरोबर नगरसेवकांना जाब विचारला जात आहे.

नगरसेवकाने एखादे काम सांगितल्यास त्यांचे ऐकले जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, एखादे काम एजंटाकरवी घेऊन गेल्यास त्या फाईलचा तातडीने निपटारा केला जात आहे. राज्य सरकारच्या सूचनुसार ई-आस्थी प्रणाली अंतर्गत शहर व उपनगरातील मिळकतींची नोंदणी करून घेतली जात आहे. त्यानंतर संबंधितांना ए व बी खात्यांचे वितरण केले जात आहे. मात्र, ए व बी खाते देण्यासाठी देखील मोठ्या रकमेची मागणी केली जात आहे. उतारा देण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये लाच स्वीकारली जात असल्याचा आरोप विरोधी गटातील नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे याबाबत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासह संबंधितांची चौकशी करावी, अशी मागणी करत दोन दिवसांपूर्वी विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी महापालिका प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी पाच महसूल निरीक्षकांची तडकाफडकी बदली केली आहे. संबंधित निरीक्षकांना वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्तांनी केलेल्या या मेजर सर्जरीमुळे महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

विभागीय आयुक्तांची नियुक्ती

महापालिकेचे प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांची प्रभाग क्र. 1 ते 20 चे विभागीय आयुक्त महणून नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल अधिकारी अनिल बोरगावी यांची प्रभाग क्र. 21 ते 39 आणि संतोष अनिशेट्टर यांची 40 ते 58 या प्रभागांचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली आता ई-आस्थी अंतर्गत नोंद केल्या जाणाऱ्या मिळकतींना ए आणि बी खात्यांचे वितरण केले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.