विजय देवणेंसह पाच जणांची वकालत दाखल
‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याप्रकरणी चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात सुनावणी सुरू
बेळगाव : कोनेवाडी ता. बेळगाव येथे भगवा ध्वज फडकवण्यासह ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याने कन्नड आणि मराठी भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत काकती पोलिसांनी 2021 मध्ये कोल्हापूरचे शिवसेनाप्रमुख विजय देवणेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात सुरू असून संशयितांना न्यायालयाने समन्स बजावले होते. त्यानुसार गुरुवारी सर्वजण न्यायालयासमोर हजर झाले. त्यामुळे त्यांच्यावतीने वकिलांनी न्यायालयात वकालत दाखल केली. बेळगाव महानगरपालिकेसमोर 21 जानेवारी 2021 रोजी कन्नड संघटनांनी लालपिवळा ध्वज उभारला होता. त्यामुळे संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट पसरली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, सुनील शिंत्रे, अमृत जत्ती आणि संतोष माळवीकर यांनी कोनेवाडी गावात भगवा ध्वज फडकावला होता. तसेच त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्याने त्यांच्याविरोधात काकती पोलिसांनी भादंवि कलम 143, 147, 153 नुसार कन्नड आणि मराठी भाषिकांत तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे वरील सर्व पाच जणांना समन्स बजावले होते. गुरुवारच्या सुनावणीला सर्वजण न्यायालयासमोर हजर झाले. वकिलांनी संशयितांतर्फे न्यायालयात वकालत दाखल केली. आता या खटल्याची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. संशयितांतर्फे अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंच्चण्णावर काम पहात आहेत.