दोघा पोलिसांसह पाचजणांना अटक
उगवे येथील रेती कामगारांवर गोळीबार प्रकरण : एकूण 12 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पेडणे : उगवे जैतीर येथे मंगळवार दि. 28 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर तेरेखोल नदीत रेती उपसा करणाऱ्या रामऋषी पासवान, लालबाबु गौंड या कामगारांवर गोळीबार करुन त्यांना जखमी केल्याप्रकरणी उगवे येथील नेहाल नितीन महाले (20 वर्षे), आशिष शिवाजी महाले (24 वर्षे), अक्ष अऊण महाले (24 वर्षे), ऋषिकेश दशरथ महाले (32 वर्षे) व गंगाराम गोपीचंद महाले (34 वर्षे) या पाच जणांना काल रविवारी पहाटे पेडणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पेडणे पोलिसस्थानकावर पत्रकार परिषदेत दिली. पेडणेचे निरीक्षक सचिन लोकरे, गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक तुषार लोटलीकर यावेळी उपस्थित होते. या घटनेतील हल्लेखोरांच्या शोधात गेले अनेक दिवस पेडणे पोलिस यंत्रणा तसेच इतर पोलिस, पेडणे उपअधीक्षक, उत्तर गोवा अधीक्षक कार्यरत होते. योग्य आणि ठोस पुरावे मिळत नसल्याने हल्लेखोरांना पकडण्यास विलंब झाला होता. मात्र अखेर या पाचजणांना पेडणे पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्या पाचजणांपैकी ऋषिकेश महाले हा आरबीआय पोलिस असून गंगाराम महाले हा एटीएसमध्ये कॉन्स्टेबल आहे. या दोघांवरही सरकारी नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. हे दोन्ही पोलिस निलंबित होणार आहेत.
दोन कामगार झाले जखमी
अधीक्षक राहुल गुप्ता म्हणाले की, मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास तेरेखोल नदीत बेकायदेशीररित्या रेती उपसा करण्यासाठी रेती कामगारांचा गट होडीद्वारे गेला होता. या कामगारांवर उगवे परिसरातील पाचजणांच्या गटाने बंदुकीने गोळीबार केला. त्यात रामऋषी पासवान आणि लालबाबू गौंड यांच्या मानेला तसेच हाताला गोळी लागली होती. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी यापूर्वी रॉबर्ट फर्नांडिस व अशोक मुळगावकर या रेती व्यवसायिकांना तसेच त्यांच्या पाच रेती कामगारांनाही बेकायदेशीर रेती व्यवसाय करत असल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. हे सातजण व रविवारी अटक करण्यात आलेले पाचजण मिळून एकूण 12 जणांना याप्रकरणी अटक झाली आहे.
गोळीबार कोणी, कोणत्या बंदुकीने केला?
- रविवावरीअटक करण्यात आलेल्या पाचही हल्लेखारांवर शस्त्र कायद्यांतर्गत तसेच जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- यापाचपैकी कोणी गोळीबार केला? कुठल्या बंदुकीने केला? याची चौकशी सध्या सुरू आहे.
- आजसोमवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
रेती व्यवसायिकांची होणार कसून चौकशी
- तेरेखोलनदीत कायद्याने रेती काढण्यास बंदी असूनही बेकायदेशीरपणे रेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
- उगवेभागातील नागरिकांचा या रेती व्यवसायाला विरोध असल्याने हा हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे.
- तेरेखोलनदीत नईबाग तसेच पोरस्कडे भागात बेकायदेशीर रेती व्यवसायात गुंतलेल्यांची कसून चौकशी होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.