हर्षिता ठाकुर यांच्यासह पाच जणांना सशर्त जामीन मंजूर
बेळगाव : मच्छे येथे आयोजित हिंदू सभेवेळी पिरनवाडी दर्ग्याजवळ बाण सोडल्याचा हावभाव केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत हर्षिता ठाकुर यांच्यासह पाच जणांवर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील हर्षिता ठाकुर, सुर्पित शिंपी, श्रीकांत कांबळे, बिटाप्पा तारिहाळ, गंगाराम तारिहाळ यांना मंगळवार दि. 3 रोजी जेएमएफसी द्वितीय न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
18 जानेवारी 2026 रोजी मच्छे येथे हिंदू सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेला हर्षिता ठाकुर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमापूर्वी मच्छे भागातून काढण्यात आलेली मिरवणूक पिरनवाडी येथील दर्ग्याजवळ आली. त्यावेळी हर्षिता ठाकुर यांनी त्या ठिकाणी बाण सोडल्याचा हावभाव केला. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्याचा ठपका ठेवत बेळगाव ग्रामीण पोलीस
स्थानकात अब्दुलखादर मुजावर, रा. पिरनवाडी यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी वरील पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. वरील पाच जणांनी 3 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर होऊन जामीन अर्ज दाखल केला. त्यामुळे जामीन अर्जावर सुनावणी होऊन जेएमएफसी द्वितीय न्यायालयाचे न्यायाधीश गुरुप्रसाद सी. यांनी सर्वांना पाच हजार रुपयाचे हमीपत्र व तितक्याच रकमेचा जामीनदार, यासारखा गुन्हा परत करू नये, प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहणे या अटींवर जामीन मंजूर केला आहे. बचाव पक्षातर्फे अॅड. प्रताप यादव, अॅड. हेमराज बेंचण्णावर, अॅड. स्वप्नील नाईक, अॅड. प्रज्ज्वल अथणीमठ यांनी काम पाहिले.