समुद्रात बुडणाऱ्या पाच जणांना जीवदान
मजूर-पर्यटकाना जीवरक्षकानी वाचविले
कारवार : येथील अरबी समुद्रात बुडणाऱ्या दोन मजुरांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. सिकंदर आणि सुधीर कुमार (रा. दोघेही मुळचे उत्तर प्रदेश) अशी वाचविण्यात आलेल्या मजुरांची नावे आहेत. दुसऱ्या एका घटनेत होन्नावर तालुक्यातील कासरकोड येथील इको बीचवर बुडणाऱ्या तीन पर्यटकांना वाचविण्यात पर्यटन खात्याच्या जीवरक्षकांना यश आले. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, येथील एका खासगी कंपनीत सेवा बजावणारे सिकंदर आणि सुधीर कुमार शुक्रवारी सकाळी येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले आणि पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी अरबी समुद्रात उतरले. तथापी ते लाटेच्या विळख्यात सापडून गंटागळ्या खाऊ लागले. त्यावेळी समुद्रकिनाऱ्यावर सेवा बजावणाऱ्या केतन सावंत नावाच्या जीवरक्षकाने घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघाना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर तातडीने त्याना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांच्याही जीवावरील धोका टळल्याचे सांगण्यात आले. मद्यपान करून ते समुद्रात उतर ले होते असेही सांगण्यात आले. कारवार शहर पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
कासरकोड इको बीचवर तिघांना जीवदान
दरम्यान अन्य एका घटनेत होन्नावर तालुक्यातील कासरकोड येथील इको बीचवर बुडणाऱ्या तीन पर्यटकांना पर्यटन खात्याच्या जीवरक्षकांना वाचविण्यात यश आले. ही घटना काल रविवारी घडली. वाचविण्यात आलेल्या पर्यटकांची नावे अभिषेक, प्रितेश आणि प्रशांत (रा. सागर जिल्हा शिमोगा) अशी आहेत. पर्यटकांना वाचविलेल्या जीवरक्षकांची नावे शशांक अंबीग, योगेश अंबीग आणि श्रीकांत हरीकंत्र अशी आहेत. होन्नावर ग्रामीण पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.