राज्योत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत पाच जणांना अटक
सिव्हिल हॉस्पिटलमध्येही नेले चाकू : मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
बेळगाव : राज्योत्सव मिरवणुकीत अघटित घडू नये यासाठी व्यापक बंदोबस्त करूनही चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्योत्सवादिवशी स्वत:जवळ चाकू बाळगणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक केली आहे. यापैकी दोघा जणांनी तर चाकू घेऊन थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठले होते. तपासणीच्या वेळी त्यांच्याजवळ चाकू आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
मार्केट व माळमारुती पोलिसांनी शनिवारी पाच जणांची धरपकड केली आहे. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक हुसेन केरुर यांनी स्वीकार हॉटेलजवळ नागराज बसवाणी नायक (वय 27), नागराज बसवराज जंगळी (वय 30) दोघेही राहणार मास्तमर्डी यांना अटक करून त्यांच्याजवळून चाकू जप्त केले आहेत. त्यांच्यावर भारतीय शस्त्रास्त्र कायदा कलम 27(1) व कर्नाटक पोलीस कायदा कलम 97 अन्वये मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मार्केट पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वन खात्याच्या कार्यालयाजवळ सोहेल सरदारसाब मोकाशी (वय 25) मूळचा राहणार मुचंडी, सध्या राहणार महांतेशनगर, भूषण नागेंद्र पाटील (वय 21) राहणार जाधवनगर-बेळगाव यांना बेकायदा चाकू बाळगल्याप्रकरणी शनिवारी अटक झाली आहे. मार्केटचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एन. मेणशीनकाई यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्याजवळून ड्रॅगन चाकू जप्त करण्यात आले आहेत.
कणबर्गी येथील एका तरुणाला जांबियासह ताब्यात
माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सुरभी क्रॉसजवळ कणबर्गी येथील एका तरुणाला जांबियासह ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. एम. मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणीच्यावेळी ही कारवाई केली आहे. श्रीधर इराप्पा शिगीहळ्ळी (वय 30) राहणार ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गी असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी शनिवारी एकूण पाच जणांना अटक केली आहे.
चाकू हल्ल्यातील जखमी 3 तरुणांना हॉस्पिटलमध्ये दाखल
सदाशिवनगर येथे शनिवारी रात्री चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या पाच पैकी तीन तरुणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दोन तरुण चाकू घेऊन सिव्हिलमध्ये दाखल झाले होते. सुरक्षा रक्षकांनी तपासणीच्यावेळी चाकू मिळाल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.