खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून पाचजणांची निर्दोष मुक्तता
नववे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
बेळगाव : तलवार हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून नववे जिल्हा सत्र न्यायालयाने पाच जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. विशालसिंग चव्हाण, प्रथमेश गणिकोप्प, सर्वेश सपकाळ, रोहन बिर्जे, अरुण हिरेमठ अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. अमित अतकर (रा. सरस्वतीनगर, गणेशपूर) हा आपला मित्र विशाल सोनार याच्यासोबत शहापूर येथे दांडिया कार्यक्रम बघण्यासाठी गेला होता. विशाल चव्हाण याने अमित अतकर याला विशाल सोनार सोबत पाहिले. हे दोघे जण आपल्याला मारण्यासाठी आले आहेत, असा संशय विशालसिंगला आला. यानंतर 18 जून 2019 रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान फिर्यादी अमित व त्याचा मित्र विशाल सोनार आणि आकाश गवळी हे सर्वजण यंदे खूट येथील वनिता विद्यालय शेजारी पाणीपुरी खाण्यासाठी आले होते.
त्यावेळी विशालसिंग हा त्याठिकाणी तलवार घेऊन आला. त्याने फिर्यादी अमित याच्यासह त्याच्या अन्य दोघा मित्रांवर तलवारीने हल्ला केला होता. त्याचबरोबर अन्य चौघांनीही अमित व त्याच्या मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने सर्वजण गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटल व केएलई हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. अमित अतकर याने कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिल्याने पोलिसांनी विशालसिंग चव्हाण व त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून घेतला. प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी नववे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. मात्र सबळ पुराव्याअभावी वरील सर्वांची न्यायाधीश दिंडलकोप्प शिवपुत्र यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. बचाव पक्षाच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. प्रताप यादव यांनी काम पाहिले.