‘जैश’च्या आणखी पाच संशयितांना अटक
गुजरात एटीएसची कारवाई : दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश
► वृत्तसंस्था / अहमदाबाद
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी गटाशी संबंधित पाच संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांना पाटण जिह्यातील सिधपूर तालुक्यातल्या खाडियाल गावातून अटक करण्यात आली. यापूर्वी, 3 जुलै रोजी ‘जैश’शी संबंधित आठ संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे आता नवी मोहीम राबवत पाच जणांना अटक करण्यात आली.
बिलाल आबिदभाई शेरा, मोहम्मद अयुब काडीवाला, मोहम्मद पालनपुरी उर्फ खाली अयुब सुनसारा, शफिया रईस मुक्ती आणि मोहम्मद हसन करदिया अशी कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मेहसाणा जिह्यातील काढी शहरात न्यायिक दंडाधिकारी आर. एम. भाटिया यांच्यासमोर हजर केल्यानंतर त्यांना 24 जुलैपर्यंत एटीएसची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईच्या माध्यमातून एटीएसने आणखी एका मोठ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे.
बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न असफल
अटक केलेल्या आरोपींपैकी एकाने टाइम बॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला, असे सरकारी वकील पी. आर. दंतानी यांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांना अजूनही बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि उर्दूमध्ये लिहिलेले जैश-ए-मोहम्मद संघटनेची माहिती असलेले दस्तावेजही सापडले आहे. बॉम्ब बनवण्याचे साहित्य त्यांनी कुठून आणले आणि कुठे लपवले होते याचा तपास करण्यासाठी त्यांची आता कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच, जिहादी पुस्तके कुठे सापडली आणि ती कुठे ठेवली होती, हेही जाणून घ्यायचे आहे.
संशयित पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात
अटक करण्यात आलेले संशयित सोशल मीडियाच्या माध्यमातून अब्दुल्ला साहिब नावाच्या एका पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. हँडलरच्या सांगण्यावरून ते गुजरातमध्ये एक मजबूत जाळे उभारण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना एका व्यक्तीकडून 3 लाख रुपयेही मिळाले होते. ते गुजरातच्या पाटण येथील एका मदरशात राहत होते. त्या मदरशातून साहित्य आणि काही पत्रकेही जप्त करण्यात आली आहेत.