राजापूर-कोंड्येत एकाच रात्री पाच बंद घरे फोडली
राजापूर :
तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह अन्य दोन वाड्यात चोरट्यांनी एकाच रात्रीत 5 बंद घरे फोडून सुमारे 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल लांबवल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सोमवारच्या मध्यरात्री ही चोरी झाल्याचे उघड झाले.
तालुक्यातील कोंड्ये येथील शिक्षक कॉलनीसह बौद्धवाडी व मधलीवाडी येथील रहिवासी कोंड्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक महाडेश्वर, अॅड. मुरलीधर मोरे, योगेश मोरे, शशिकांत लाड, अविनाश रामचंद्र तावडे अशी पाच बंद घरे फोडून चोरट्यांनी सुमारे साडेचार लाख ऊपयांचा ऐवज लंपास केला. या बाबतची माहिती येथील ग्रामस्थांनी राजापूर पोलिसांना देताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. गेल्या अनेक दिवसानंतर राजापुरात मोठी घरफोडी झाल्याने पुन्हा चोरट्यांनी आपला मोर्चा राजापूरकडे वळवल्याचे दिसत आहे. एकाच रात्रीत 5 बंद घरे चोरट्यांनी फोडल्याने राजापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
या चोरीप्रकरणी अशोक महाडेश्वर यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. घरफोडी झालेली घरे बंद स्थितीत होती. कुणीही घरी नव्हते, त्याचा फायदा चोरट्यांनी उठवला. योगेश सुरेश मोरे याचे बंद स्थितीत असलेल्या घराचे पितळेचे लॉक तोडून रात्रीच्या वेळी आतमध्ये प्रवेश कऊन चोरी करताना घरातील साहित्य विस्कळीत केले. त्याचप्रमाणे मुरलीधर मोरे यांचे बंद स्थितीत असलेल्या घरात प्रवेश कऊन चोरट्याने 4 चांदीच्या मूर्ती व रोख रक्कम 10 हजार ऊपये असा त्यांचा एकूण रक्कम 50 हजार ऊपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस नेला. तसेच कोंड्यो गावातून पांगरे गावाकडे जाणाऱ्या रोडवरील बंद स्थितीत असलेले अविनाश तावडे व शशिकांत लाड यांच्या घरातही चोरी झाली. यात दागिने व रोख रक्कम अशी एकूण 3,93,000/- ऊपये किंमतीचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली. या चोरींच्या घटनांमधून एकूण एकत्रित 4 लाख 43 हजार ऊपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.
या चोरी प्रकरणी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. मात्र तपासात नेमकी काय माहिती मिळाली, ते समजू शकले नाही. आता या चोरी प्रकरणाचा राजापूर पोलीस कसून तपास करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली आणि पोलिसांना सूचना दिल्या.