कराडमध्ये माजी नगराध्यक्षांच्या घरी पाच लाखाची चोरी
कराड :
येथील माजी नगराध्यक्षा उमा हिंगमिरे व सामाजिक कार्यकर्ते उदय हिंगमिरे यांच्या मार्केट यार्ड परिसरातील घरी चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करत कपाटातील सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने लंपास केले. सोमवारी भरदुपारी घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत उदय चंद्रकांत हिंगमिरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मार्केट यार्डमध्ये उदय हिंगमिरे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उदय हिंगमिरे हे त्यांच्या ऑफिसवर गेले होते. त्यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी उमा हिंगमिरे याही नोकरीच्या ठिकाणी गेल्या. घराबाहेर जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उमा हिंगमिरे या घरी आल्या. तर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास उदय हिंगमिरे घरी आले. त्यानंतर रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले.
मंगळवारी सकाळी उमा हिंगमिरे यांना संक्रांतनिमित परिधान करण्यासाठी दागिने हवे असल्यामुळे त्यांनी घरातील कपाट उघडून पाहिले असता कपाटात दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती पती उदय हिंगमिरे यांना दिली. दोघांनी कपाटात पाहिले असता कपाटातील साडेपाच तोळे वजनाचे 3 लाख 30 हजार ऊपये किमतीचे मंगळसूत्र, 2 तोळ्याचा 1 लाख 20 हजार ऊपये किमतीचा नेकलेस आणि 60 हजार रुपये किमतीच्या एक तोळे वजनाच्या बांगड्या चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.