For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन गटातील संघर्षात ओडिशात पाच ठार

06:23 AM Oct 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन गटातील संघर्षात ओडिशात पाच ठार
Advertisement

महाराष्ट्रातील कुटुंबाचा समावेश, चौघांची प्रकृती चिंताजनक : सुंदरगडमध्ये रक्तरंजित संघर्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ सुंदरगड

ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातील करमाडीही गावात मंगळवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 5 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या संघर्षात तीन कुटुंबांचा समावेश असून त्यापैकी काहीजण महाराष्ट्रातील वर्धा येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर एक महिला आणि चार मुले बेपत्ता आहेत. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहबाह्य संबंध हे भांडणाचे कारण होते.

Advertisement

दोन गटांमध्ये झालेल्या वादावादीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. चमा भोला (25), पुंडी पवार (65), सुभाष पवार, चनम कुमार भोसले (40), भुक्मया कैला (56) अशी मृतांची नावे आहेत.  जखमींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांना सुंदरगड ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

रात्री झोपेत असताना हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील वर्धा, झारखंडमधील धनबाद आणि बिहारमधील छपरा येथून हे तिन्ही समुदाय चार-पाच दिवसांपूर्वी सुंदरगडमध्ये आले होते. वर्ध्याहून आलेल्या कुटुंबातील अविनाश पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून त्यात मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास आपले कुटुंबीय झोपले असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात अविनाश पवार हेसुद्धा जखमी झाले आहेत. हाणामारीत चाकू आणि रॉडचाही वापर करण्यात आला. तणावाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून गांभीर्याने सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

Advertisement
Tags :

.