चित्तूरजवळील अपघातात कर्नाटकातील पाच ठार
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरहून तिऊपतीला जाणाऱ्या एका कारला आंध्र प्रदेशातील चित्तूरजवळ अपघात झाला. या अपघातात कर्नाटकातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी चित्तूर जिल्ह्यातील पलमनेरूजवळ कारने ट्रकला मागून धडक दिल्याने कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. मोहनदास (वय 71), नागराज (वय 61), कुसुमा (वय 61), जयंती (वय 59) आणि पूजा (वय 33, सर्वजण रा. राजाजी नगर, बेंगळूर), अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. या धडकेत कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढताना पोलिसांना कठीण झाले.
या अपघाताची माहिती मिळताच पलमनेरू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. गाडीच्या वेगामुळे नियंत्रण सुटले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी ऊग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेची नोंद पलमनेरू पोलिसांत झाली असून पुढील तपास सुरू आहे.