बांगलादेशी महिलेसह पाच घुसखोरांना अटक
वृत्तसंस्था/ सुपौल
भारत-नेपाळ सीमेवर तैनात असलेल्या सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) बांगलादेशी घुसखोरांचा बेकायदेशीर प्रवेशाचा प्रयत्न उधळून लावला आहे. याप्रकरणी एका बांगलादेशी महिलेसह एकूण पाच संशयितांना अटक करण्यात आली. ही कारवाई एसएसबीच्या 45 व्या बटालियनच्या कुनौली येथील डी सम्वे यांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सीमा चौकी कुनौली चेक पोस्ट 02 (बीपी क्रमांक 223 जवळ) येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी काही व्यक्तींना संशयास्पद पद्धतीने फिरताना आणि तपासणीतून वाचण्याचा प्रयत्न करताना पाहिले. पोस्ट कमांडर साहाय्यक उपनिरीक्षक (जनरल) संजय कुमार यांनी तातडीने कारवाई करून त्यांना चौकीवर बोलावत ओळखपत्रांची मागणी केली. या चौकशीदरम्यान अटक केलेल्या व्यक्तींची ओळख उघड झाली. एती अख्तर (28 वर्षे) ही बांगलादेशातील गाजीपूर येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच मोहम्मद शकिब (25) आणि मो बिलाल (25) हे दोघेही उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील रहिवासी आहेत. तसेच प्रमोद प्रसाद (24) आणि रमेश कुमार हे दोघेही नेपाळमधील सप्तरी येथील रहिवासी असून हे पाचही जण घुसखोरी करताना रंगेहाथ जाळ्यात सापडले. प्राथमिक तपासात सर्व व्यक्ती नेपाळमधून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. बांगलादेशी महिलेकडे भारतात येण्यासाठी वैध व्हिसाही नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.