For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

असनियेवासियांचे महावितरणच्या विरोधात पाच तास ठिय्या आंदोलन

11:33 AM Jul 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
असनियेवासियांचे महावितरणच्या विरोधात पाच तास ठिय्या आंदोलन
Advertisement

जीर्ण वीज वाहिनी व विद्युत खांब बदलण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

असनिये-वायंगणवाडी येथे मंगळवारी सायंकाळी उशिरा विद्युत भारित वीज वाहिनी कोसळून एक बैल जागीच ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या असनियेवासियांनी गावातील जीर्ण वीज वाहिनीसह विद्युत खांब बदलण्याबाबत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत मृत बैलाच्या ठिकाणी पाच तास आंदोलन छेडले. यावेळी येत्या सोमवारी याबाबत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन महावितरणने दिल्यानंतर तब्बल पाच तासानंतर मंगळवारी रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेतले.गावातील प्रलंबित विविध समस्या बाबत अनेक वेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करीत संतप्त असनियेवासियांनी आंदोलन छेडले. जोपर्यंत गावातील सुरळीत वीजपुरवठासह जीर्ण वीज वाहिनी व विद्युत खांब बदलण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची आक्रमक भूमिका संतप्त झालेल्या असनिये वासियांनी घेतली. यावेळी तणाव निर्माण झाल्यामुळे बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री झांजुर्डे पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थ ठोस आश्वासनाअभावी आपल्या भूमिकेवर ठाम होते.तब्बल पाच तास हे आंदोलन मृत बैलाच्या ठिकाणी सुरू होते. अखेर सावंतवाडीचे उप अभियंता शैलेंद्र राक्षे यांनी येत्या सोमवार पासून गावातील जीर्ण वीज वाहिनी व विद्युत खांब बदलण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र याच वेळी संतप्त ग्रामस्थांनी सोमवारपासून कामात सुरुवात न केल्यास बुधवारी १६ जुलै रोजी सावंतवाडीत महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.या आंदोलनात असनिये सरपंच रेश्मा सावंत, पोलीस पाटील विनायक कोळापटे, शरद सावंत, लक्ष्मण सावंत, सत्यवान सावंत, दिपक पेडणेकर, सूर्यकांत सावंत, भरत सावंत, रामा सावंत, दशरथ सावंत, उत्तम सावंत, जीतू सावंत, दिलीप सावंत, गुंडू सावंत, कृष्णा सावंत, भिकाजी नाईक, भिकाजी सावंत, पांडुरंग सावंत, भरत पेडणेकर, न्हानू, सावंत, वासुदेव सावंत यांच्यासह वायंगणवाडी, गावठाणवाडी, कणेवाडी ग्रामस्थांसह असनियेवासीय सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.