फेडरेशनकडून पाच माजी खेळाडूंवर आजीवन बंदी
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (पीएचएफ) बुधवारी समांतर संस्था तयार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ऑलिंपिकमध्ये खेळलेल्या पाच माजी हॉकीपटूंवर आजीवन बंदी घातली आहे. ‘पीएचएफ’चे अध्यक्ष तारिक बुग्ती यांनी सांगितले की, ऑलिम्पिकमध्ये खेळलेले आंतरराष्ट्रीय खेळाडू नसीर अली, खालिद बशीर, सलीम नझीम, अब्बास अली आणि हैदर अली यांच्यावर ही आजीवन बंदी घालण्यात आली आहे.
‘समांतर महासंघ चालविण्याचा प्रयत्न करणे, पीएचएफच्या नोंदी चोरणे आणि पीएचएफच्या खात्यातून मंजुरीशिवाय निधी वापरणे यासाठी ते दोषी आढळले आहेत, असे बुग्ती म्हणाले. गेल्या वर्षी ब्रिगेडियर (निवृत्त) सज्जाद खोकर यांना पीएचएफ प्रमुखपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर महासंघावर ताबा मिळविण्यासाठी दोन गटांमध्ये सत्तासंघर्ष सुरू आहे. एका गटाचे नेतृत्व बलुचिस्तानमधील प्रभावशाली राजकारणी बुग्ती आणि दुसऱ्या गटाचे नेतृत्व कराचीतील प्रभावशाली राजकारणी सेहला रझा या करत होत्या.
सेहला रझा या पक्षातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदावर दावा आणि संघर्षापासून दूर गेल्यानंतर पाकिस्तान क्रीडा मंडळ आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने बुग्ती आणि माजी ऑलिंपिकपटू राणा मुजाहिद यांच्या नेतृत्वाखालील ‘पीएचएफ’ला मान्यता दिली होती. बंदी घातलेल्या पाचपैकी खालिद बशीर आणि नासिर अली हे ऑलिम्पिक पदक जिंकणारे ख्यातनाम बचावपटू असून सलीम नझीम हाही विख्यात मिडफिल्डर राहिला होता.