अपघातात बेंगळूरचे पाच भाविक ठार
चित्रदुर्गजवळ भरधाव कारची ट्रकला मागून धडक : सौंदत्ती यल्लम्माचे दर्शन घेऊन परतताना घटना
प्रतिनिधी/ बेंगळूर
भरधाव वेगाने आलेल्या कारने ट्रकला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. चित्रदुर्गच्या तमटकल ब्रिजजवळ रविवारी दुपारी ही घटना घडली. चिदंबर आचार्य (वय 52, रा. सी. व्ही. रामणनगर), मल्लिकार्जुन (वय 50, रा. इरण्णा वसाहत), ऊद्रस्वामी (वय 52, रा. विद्यारण्यपुर) आणि शांतमूर्ती (वय 60) अशी या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अन्य एकाचे नाव समजू शकलेले नाही.
कारमध्ये रेणूका यल्लम्माचा प्रसाद आढळून आला आहे. त्यानुसार हे सर्वजण सौंदत्ती यल्लम्माचे दर्शन घेऊन परतत असताना रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. कारमधील आणखी एक भाविका गंभीर जखमी असून त्याला उपचारसाठी चित्रदुर्गच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात कारचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चित्रदुर्ग ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याचबरोबर ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही भेट देऊन अपघाताची माहिती घेतली. कारचा वेग अधिक असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची नोंद चित्रदुर्ग ग्रामीण पोलिसांत झाली आहे.
अपघातानंतर लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू
वेगाने आलेल्या खासगी बसने कारला धडक दिल्यानंतर कारला आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर कारमधील अन्य तिघेजण सुखरुप बचावले आहेत. चिक्कबळ्ळापूर जिल्ह्याच्या चिंतामणी तालुक्यातील गोपल्ली गेटजवळ रविवारी ही घटना घडली. कलावती (वय 35) आणि धनंजय रे•ाr (वय 31, दोघही रा. आंध्र प्रदेश), अशी मृतांची नावे आहेत. या भीषण अपघातात कारला आग लागली तर बस उलटली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिंतामणी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.