सरकारी खात्यातून पाच कोटी रुपये गायब
आर्थिक फसवणुकीने ‘एसएसए’हादरले
पणजी : समग्र शिक्षा अभियनाच्या (एसएसए) शिक्षणासाठी असलेल्या गोवा सरकारच्या निधीतून सुमारे 5 कोटी ऊपये सरकारी बँक खात्यामधून लंपास करण्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे समग्र शिक्षा अभियानाला आर्थिक फसवणुकीने हादरवून टाकले आहे. एका जागरूक बँक व्यवस्थापक/कर्मचाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे सरकारी निधीच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे. तसेच संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
याबाबत समग्र शिक्षा अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. शंभू घाडी यांनी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 336(1), 336(2), 336(3), 338, 340(2) आणि 318 अंतर्गत गुन्हा नोंद करून) या संशयिताला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. अटक केलेल्या संशयिताला 30 मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
अटक केलेल्या संशयिताचे नाव रॉबिन एल. पॉल (वय 41, पश्चिम बंगाल) असे आहे. तसेच या प्रकरणी समग्र शिक्षा अभियानाच्या चार कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील एका खासगी बँकेतील सतर्क बँक व्यवस्थापक/कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच हा घोटाळा उघडकीस आला, त्यांनी समग्र शिक्षा अभियान (एसएसए) खात्याशी संबंधित संशयास्पद व्यवहारांकडे प्रकल्प संचालकांचे लक्ष वेधले आणि प्रकरण वेळीच उघडकीस आले. अन्यथा आणखीनही रक्कम गायब झाली असती.
समग्र शिक्षा अभियान गोवाच्या नावाने मोठ्या प्रमाणात ठेवी आणि चेक वटवून वैयक्तिक खात्यात जात असल्याचे बँक कर्मचाऱ्यांना आढळले. एसएसए अधिकाऱ्यांना माहिती मिळेपर्यंत सुमारे 5 कोटी ऊपये आधीच पळवले गेले होते, असे उघड झाले आहे. अटक केलेल्या पश्चिम बंगालच्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, त्याचे खाते त्याच्या पूर्ण माहितीशिवाय वापरले गेले आणि कोविड-19 साथीच्या आजारापासून तो आर्थिक संकटाचा सामना करत आहे. एका व्यक्तीने त्याला त्याच्या व्यवसायासाठी कर्ज देण्याचे आश्वासन दिले, परंतु त्याचे खाते उघडण्याचा आग्रह धरला. त्याने माहिती दिल्यानंतर, सुमारे 2 कोटी ऊपयांचे चेक जमा करण्यात आले ज्यावर सर्व शिक्षा अभियानाचे नाव असल्याचा आरोप आहे. यामुळे बँकेबाबत संशय निर्माण झाला आहे. पोलिस आता कथित मास्टरमाईंडचा शोध घेत आहेत.