बलात्कार प्रकरणात पाच दोषींना जन्मठेप
गुजरातमधील वडोदरा येथे नवरात्रीदरम्यान घटना
वृत्तसंस्था/ वडोदरा
गुजरातमधील वडोदरा न्यायालयाने राज्यात अत्यंत गाजलेल्या भायली सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाचही आरोपींना सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना प्रत्येकी 50,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. तसेच न्यायालयाने पीडितेला 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. ही घटना 4 ऑक्टोबर 2024 च्या रात्री घडली. नवरात्रीदरम्यान गरबा कार्यक्रमातून परतणारी अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत एका निर्जन भागातून जात होती. याचवेळी आरोपींनी तिला थांबवून तिच्या मैत्रिणीला ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.
आरोपींची नावे मुन्ना अब्बास बंजारा, मुमताज उर्फ आफताब सुभेदार बंजारा, शाहरुख किस्मत अली बंजारा, सैफ अली मेहंदी हसन बंजारा, अजमल सतार बंजारा अशी आहेत. याप्रकरणी तपास यंत्रणांनी सखोल तपास करताना 6 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी खटला चालवण्यासाठी तीन सरकारी वकिलांची नियुक्ती केली होती. सुमारे 22 महिन्यांनंतर पीडितेला न्याय मिळाला आहे. पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावताना न्यायालयाने पीडितेला 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.