भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी पाच जणांमध्ये चुरस
नववर्षात मिळणार नवीन अध्यक्ष नरेंद्र सावईकर, दामू नाईक सर्वाधिक चर्चेत
प्रतिनिधी/ पणजी
नवीन वर्षात होणाऱ्या भाजपच्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून प्रदेशाध्यक्ष बनण्यासाठी पाच जणांमध्ये चुरस वाढली आहे. त्यात माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामू नाईक, माजी मंत्री दिलीप पऊळेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर व दयानंद सोपटे यांची नावे चर्चेत आहेत.
या निवडणूक प्रक्रियेंतर्गत येत्या दि. 31 पर्यंत सर्व बूथ समित्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यानंतर मंडल समिती, जिल्हा कार्यकारिणी, महिला अध्यक्ष, युवा मोर्चा यांच्या विविध सेलचे अध्यक्ष निवडण्यात येतील. शेवटी प्रदेशाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.राज्यसभा खासदारपदी निवड झालेले विद्यमान प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ यापूर्वीच संपलेला आहे. तरीही त्यांना प्रथम लोकसभा निवडणूक आणि नंतर महाराष्ट्रातील निवडणुकीमुळे मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार हे निश्चित झाले आहे.भाजपने हल्लीच मार्गी लावलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेंतर्गत 4 लाख सदस्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. दि. 29 रोजी राज्यस्तरीय कार्यशाळा होईल. या कार्यशाळेला पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष रेखा वर्मा आणि गोवा प्रभारी आशिष सूद उपस्थित राहणार आहे.
प्राप्त माहितीनुसार प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या पाच जणांमध्ये माजी खासदार नरेंद्र सावईकर आघाडीवर असल्याचे समजले आहे. त्यापाठोपाठ दामू नाईक यांच्याही नावाची चर्चा असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी अंतर्गत चाचपणी सुरू झाली आहे. तत्पूर्वी पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व, कोअर कमिटी, मुख्यमंत्री यांच्यात बैठक होईल. त्यातून सर्वसमावेशक प्रदेशाध्यक्ष निवडण्यात येणार आहे.