बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी, स्त्रीभ्रूणहत्येप्रकरणी पाच जणांना अटक
बेंगळूर : बेकायदेशीर गर्भलिंग चाचण्या आणि स्त्री भ्रूणहत्येत सहभागी असल्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी गुरु वारी दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या गृह मतदारसंघ वरुणामध्ये ही टोळी कार्यरत होती. बेकायदेशीर गर्भलिंग चाचण्या आणि भ्रूणहत्येची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी वरुणामधील बन्नूर महामार्गावरील हुनगनहळ्ळी गावातील एका फार्महाऊसवर छापा टाकून संशयितांना अटक केली. आरोग्यमंत्र्यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर या कारवाईची माहिती शेअर केली. बन्नूर महामार्गाजवळील हुनगनहळ्ळी येथील फार्महाऊसमध्ये भ्रूणहत्या होत असल्याचे आढळून आले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त कारवाईद्वारे भ्रूणहत्या करणाऱ्यांना अटक केली आहे. गर्भवती महिलेच्या मदतीने गर्भलिंग चाचणी करण्यात आल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान, गर्भलिंग चाचणी करण्यासाठी घटनास्थळी चार गर्भवती महिला आढळून आल्या आहेत. तसेच एक स्कॅनिंग मशीनही आढळून आले. प्रसूतीपूर्व लिंग निर्धारण चाचणी (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.