For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाडापाडी प्रकरणी दिल्लीत 5 अटकेत

06:22 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाडापाडी प्रकरणी दिल्लीत 5 अटकेत
Advertisement

मशिद परिसरात प्रशासकीय कमचाऱ्यांवर दगडफेक

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीतील फैझ ए इलाही नामक मशिदीच्या परिसरात अतिक्रमणे हटविण्यासाठी पाडापाडी करण्यास गेलेल्या दिल्ली महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. आता दिल्ली पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 5 गुंडांना अटक केली आहे. ही मशिद तुर्कमान गेटनजीक आहे. या दगडफेकीच्या घटनांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रसारित केले जात आहे. त्यांच्या आधारावर अटकसत्र होत आहे.

Advertisement

बुधवारी दिल्ली महानगरपालिकेचे कर्मचारी जेसीबी मशिन्ससह मशिदीच्या परिसरात अतिक्रमणे हटविण्यासाठी गेले होते. त्यांच्यासमवेत पोलीसही होते. मात्र, त्यांनी अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केल्यानंतर 20 ते 25 जणांच्या टोळक्याने कर्मचारी आणि पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला. दगडफेकीत 5 पोलीस आणि काही कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेक करताना दंगलखोर विशिष्ट धर्माच्या नावाने घोषणा देत होते, असे व्हिडीओंमधून दिसून आल्याने कारवाई होत आहे.

अतिक्रमण हटाव कायदेशीर

मशिदीच्या अवतीभोवतीच्या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. मशिदीच्या मूळ आकारतही बेकायदेशीर परिवर्तन करण्यात आले आहे. या अतिक्रमणांच्या विरोधात दिल्ली महानगरपालिकेने रीतसर नोटीसा दिल्या होत्या. त्यानंतर कायद्याचे आणि नियमांचे पालन करुनच अतिक्रमणे हटविण्यात येत होती. तरीही दंगलखोरांनी दगडफेक करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कठोर कारवाई करण्यात येत आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जमाव वाढविण्याचा प्रयत्न

अतिक्रमणे पाडण्याच्या वेळी उपस्थित काही लोकांनी पाडापाडीचे व्हिडीओ काढून ते प्रसारित केले. तसेच दूरध्वनी करुन अन्य लोकांना तेथे बोलावून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणात जमाव जमवून अतिक्रमण विरोधी कारवाई रोखण्याचा काही जणांचा प्रयत्न होता, ही बाबही आता स्पष्ट होत आहे. दिल्लीच्या मध्यभागाचे पोलीस आयुक्त निधीन वालसन यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमण विरोधी कारवाईला प्रारंभ झाल्यानंतर 150 लोकांचा जमाव जमला होता. दगडफेक आणि हिंसाचाराचे ड्रोन चित्रणही झालेले असून त्याच्या आधारावर कारवाई केली जात आहे, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.