लोंढा रेल्वेस्थानकावर साडेपाच किलो गांजा जप्त
झारखंडहून गोव्याला गांजाचा पुरवठा करताना तरुणाला अटक
बेळगाव : झारखंडहून गोव्याला गांजा पुरवठा करणाऱ्या एका तरुणाला रेल्वे पोलिसांनी लोंढा रेल्वेस्थानकावर अटक केली आहे. त्याच्याजवळून साडेपाच किलो गांजा जप्त केला आहे. झारखंडहून गोव्याला मोठ्या प्रमाणात गांजा पुरवठा होत असल्याचे यावरून उघडकीस आले आहे. परशुराम गिरीधारी माथो (वय 24) राहणार पत्रातो ठाणा, गोलामंडल, बेतुलकला, जि. रामघर, झारखंड असे त्याचे नाव आहे. गुरुवार दि. 23 ऑक्टोबर रोजी लोंढा रेल्वेस्थानकावर त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ 5 किलो 591 ग्रॅम गांजा आढळून आला.रेल्वेचे पोलीसप्रमुख यतिश एन., उपअधीक्षक सोमशेखर जुट्टल, मंडल पोलीस निरीक्षक सुरेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्याप्पा मुक्कन्नवर, संगाप्पा कोट्याळ, रायाप्पा गुंडगी, मानाप्पा बडीगेर, पवाडी सरव, गुरुपाद कोरी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली.
परशुरामवर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20(बी) अन्वये एफआयआर दाखल केला आहे. परशुरामची पोलिसांनी कसून चौकशी केली असता हा साठा विक्रीसाठी गोव्याला नेण्यात येत असल्याची कबुली त्याने दिली आहे. केवळ परशुरामच नव्हेतर झारखंडमधील अनेक तरुण हावडा-वास्को एक्स्प्रेस व इतर रेल्वेतून लोंढा मार्गे गोव्याला गांजा पुरवतात, अशी माहिती उघडकीस आली आहे. यापूर्वीही गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र आदी राज्यांना रेल्वेतून गांजा पुरवठा होत असल्याचे उघडकीस आले होते. लोंढा रेल्वे पोलीस स्थानकावर आरपीएफ व रेल्वे पोलिसांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला होता. त्यानंतर रेल्वेत तपासणी वाढविण्यात आली होती. रेल्वे बदलण्याच्या तयारीत असताना परशुराम पोलिसांच्या जाळ्यात अडकला.