Solapur : सोलापूरात खूनप्रकरणी पाच आरोपी अटकेत, चौघे न्यायालयात हजर
जेलरोड पोलीस तपासात हत्येच्या साखळीचा उलगडा
सोलापूर : रविवार पेठ येथील जोशी गल्ली येथे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांचा शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास धारदार शस्त्राने खून करण्यात आला. जेलरोड परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणात जेलरोड पोलिसांनी जलद कारवाई करत पाच आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात मृत्युमुखी पडलेले बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांच्या खुनामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अमर शंकर शिंदे, अतीश शंकर शिंदे, तानाजी बाबू शिंदे व शालन शंकर शिंदे या चौघांना शनिवारी जेलरोड पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मर्डेकर यांनी आरोपींची चौकशी करून शालन शंकर शिंदे (महिला) यांना पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, तर अमर शिंदे, अतीश शिंदे आणि तानाजी शिंदे या तिघांना सात जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाचवा आरोपी जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, उपचारानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या खून प्रकरणामागील नेमका हेतू पूर्ववैमनस्य आणि हल्ल्याची साखळी उलगडण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.
सरकार पक्षाकडून गुन्ह्याची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयास सांगण्यात आले. दरम्यान, आरोर्षीच्या वतीने अॅड. संतोष न्हावकर व अॅड. राहुल रुपनर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने वरीलप्रमाणे पोलीस कोठडी मंजूर केली. मृत बाळासाहेब पांडुरंग सरवदे यांच्या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृत बाळासाहेब सरवदे यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू असून, हत्येमागील कट, वापरलेली शस्त्रे व अन्य सहआरोपींची भूमिका उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जेलरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई करत खून प्रकरणाचा छडा लावण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली असून, पोलीस निरीक्षक बिराजदार तपास करीत आहेत.