भारताच्या आर्थिक वाढीचा दर फिचने वाढविला
आर्थिक वर्ष 2025 साठी जीडीपी दर 7.2 टक्क्यांपर्यंत वधारणार असल्याचा अंदाज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फिच रेटिंग या एजन्सीने मंगळवारी चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवला. मार्चमध्ये तो सात टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. रेटिंग एजन्सीने ग्राहक खर्चात सुधारणा आणि वाढलेली गुंतवणूक यांचा हवाला देत अंदाज सुधारित केला. 2025-26 आणि 2026-27 या आर्थिक वर्षासाठी, फिचने अनुक्रमे 6.5 टक्के आणि 6.2 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
फिचने आपल्या ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक अहवालात म्हटले आहे की, ‘आमचा अंदाज आहे की भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मजबूत 7.2 टक्के वाढेल. फिचचा अंदाज आरबीआयच्या अंदाजानुसार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला ग्रामीण भागातील मागणीत सुधारणा आणि महागाई कमी झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.2 टक्के दराने वाढेल असा अंदाज व्यक्त केला होता.
दरम्यान रेटिंग एजन्सीने सांगितले की गुंतवणूक वाढत राहील, परंतु अलीकडील तिमाहींपेक्षा वाढ मंद असेल, तर ग्राहकांचा आत्मविश्वास वाढल्याने ग्राहक खर्चात सुधारणा होणार असल्याचेही म्हटले आहे. पुढे सामान्य मान्सून हंगामाची चिन्हे वाढीस चालना देतील आणि महागाई कमी अस्थिर करणार असल्याचेही यावेळी नमूद केले आहे.