राष्ट्रीय हद्दीतील मासेमारीला 1 ऑगस्टपासून परवानगी
राज्याच्या 12 सागरी मैल क्षेत्रात 15 ऑगस्टपर्यंत बंदी कायम : राज्याचा नियम मोडल्यास कडक कारवाईचा इशारा
त. भा. प्रतिनिधी
रत्नागिरी :
राज्यातील मच्छीमारांना 1 ऑगस्टपासून 12 सागरी मैलापलिकडील विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मात्र 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. परंतु, हवामान विभागाकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या वादळी हवामानाच्या इशाऱ्यामुळे खोल समुद्रातील मासेमारीस 1 ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने सुरुवात होण्याची शक्यता कमीच आहे.
यंदा महाराष्ट्र शासनाने यांत्रिक मासेमारी नौकांसाठी 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मासेमारीबंदी लागू केली आहे. तर केंद्र शासनाने पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात 31 जुलैपर्यंत म्हणजे 61 दिवसांची बंदी लागू केली होती. त्यामुळे 1 ऑगस्टपासून क्षेत्रात मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे. महाराष्ट्र शासनाने यंदा राज्याच्या प्रादेशिक जलक्षेत्रातील बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत एकूण 76 दिवसांपर्यंत वाढविला असल्याने किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंतच्या समुद्रात या कालावधीत मासेमारी करण्यास परवानगी नाही. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारांना मर्यादेचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मत्स्यव्यवसाय विभागानेही मच्छीमारांना विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करताना लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बंदीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱ्यांविऊद्ध महाराष्ट्र सागरी मत्स्यव्यवसाय नियमन अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.
गस्ती नौका सज्ज आहे का?
12 सागरी मैलापलिकडील राष्ट्रीय हद्दीत मासेमारीस परवानगी देण्यात आली असली तरी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी लागू राहणार आहे. परंतु अशा एकसमान बंदी कालावधीअभावी राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी होणार नाही कशावरून आणि झालीच तर त्यावर कारवाई करण्यासाठी मत्स्य विभागाची गस्ती नौका सज्ज आहे का, असा सवाल पारंपरिक मच्छीमारांमधून उपस्थित होतो आहे.