ड्रोनच्या वापरामुळे मत्स्य व्यवसाय होणार हायटेक
कोचीन येथील कार्यशाळेत दाखवली प्रात्यक्षिके, ड्रोन तंत्रज्ञान गेम चेंजर ठरेल: केंद्रीय मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांचा विश्वास
रत्नागिरी :
देशातील मत्स्य व्यवसायात सुसूत्रता आणून मत्स्य व्यवसायाचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने मत्स्य व्यवसायात ड्रोन तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहेत. नुकतेच केरळ- कोचीन येथील भारत सरकारच्या केंद्रीय सागरी मत्स्यकी संशोधन केंद्रामध्ये ड्रोनच्या वापराविषयी जनजागृतीपर प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. यावेळी केंद्रीय मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन उपस्थित होते.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मत्स्यपालन विभागाने ८ नोव्हेंबर रोजी केरळ-कोची येथील आयसीएआर- केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था येथे मत्स्यपालन आणि सागरी मासेमारीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रात्यक्षिक या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी राज्यमंत्री कुरियन यांनी आपत्तींच्या काळात जलशेती आणि मत्स्यपालनातील पायाभूत सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर विशेष प्रकाश टाकला.
ड्रोन तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये
मत्स्य क्षेत्रातील असंख्य आव्हानांसाठी ड्रोन अनेक प्रकारे सहाय्य करू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पाण्याचे नमुने घेणे, रोग ओळखणे आणि माशांचे खाद्य व्यवस्थापन ही महत्वाची क्षेत्रे आहेत. जलशेतीचे व्यवस्थापन, मत्स्य विपणनावर लक्ष ठेवणे, मत्स्यपालनाच्या पायाभूत सुविधांच्या नुकसानीचे मूल्यांकन आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी बचाव कार्य यांचाही यात समावेश आहे. यामध्ये अचूकपणे मासे पकडणे आणि स्टॉक मूल्यांकन यासारख्या इतर प्रमुख उपक्रमांचा समावेश आहे. पाण्याखालील ड्रोन माशांच्या नैसर्गिक अधिवासातील वर्तनावर तसेच संकटाच्या लक्षणांवर लक्ष ठेवू शकतात, अशी माहिती कार्यशाळेत देण्यात आली. या कार्यक्रमात ७०० मच्छीमार व्यावसायिक सहभागी झाले होते.