आजपासून मासेमारी बंदी
कुटबणसह सर्व जेटींवर मासेमारी नौकांनी टाकला नांगर
मडगाव : आज 1 जूनपासून लागू होणाऱ्या वार्षिक मासेमारी बंदीमुळे कुटबण मासेमारी जेटीवरून कार्यरत असलेल्या बहुतांश मासेमारी नौकांनी आपला नांगर टाकला आहे. ज्यामुळे गोव्याच्या या सर्वात मोठ्या मासेमारी जेटीवरील हालचाली जवळपास ठप्प झाल्या आहेत. पावसाळ्याच्या काळात लागू करण्यात येणारी वार्षिक मासेमारी बंदी आज 1 जूनपासून अंमलात येईल आणि गोव्याच्या किनारपट्टीवर 61 दिवसांपर्यंत सुरू राहील. या बंदीच्या कालावधीत, ट्रॉलर्स आणि यांत्रिक मासेमारी नौकांना समुद्रात जाण्यास मनाई असेल. मासेमारी बंदीच्या काळात गोवेकरांना इतर राज्यातून येणाऱ्या मासळीवर अवलंबून रहावे लागणार आहे. तसेच स्थानिक रापणीद्वारे तसेच मानशिवर पकडल्या जाणाऱ्या माशांवर पुढील दोन महिने काढावे लागणार आहे.
दक्षिण गोव्यातील नेहमीच गजबजलेली कुटबण जेटी पूर्णपणे निर्मनुष्य झाली आहे. जेटीवर ट्रॉलर्स आणि मासेमारी बोटींच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जेटीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्मया काही नौका वगळता, जवळपास संपूर्ण मासेमारी नौकांनी नियोजित वेळेपूर्वीच आपले कामकाज थांबवले आहे. बोटींचे मालक आणि मच्छीमारांच्या मते, माशांची आवक अत्यंत कमी झाल्यामुळे, मासेमारीचे कामकाज लवकर गुंडाळले जाण्याची ही अलीकडील वर्षांमधील कदाचित पहिलीच वेळ आहे.
परंपरेनुसार, मे महिन्याचा दुसरा पंधरवडा हा ट्रॉलर चालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण मान्सूनकालीन मासेमारी बंदी सुरू होण्यापूर्वी, बांगडा आणि इतर व्यावसायिकदृष्ट्या मौल्यवान माशांची मोठी आवक मिळवण्यासाठी ते या कालावधीवरच अवलंबून असतात. मात्र, या हंगामात गेल्या 10 दिवसांत बहुतांश मासेमारी नौका रिकाम्या परतल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे चालकांना मासेमारीचे कामकाज थांबवणे भाग पडले. त्यांच्या अडचणींमध्ये भर म्हणून, अलीकडील दिवसांत समुद्रात दिसून आलेल्या जोरदार प्रवाहामुळे अनेक नौकांसाठी मासेमारी करणे कठीण आणि असुरक्षित बनले होते.
बोटींवर सध्या देखभालीचे काम सुरू
कुटबण मत्सव्यवसाय संस्थेचे अध्यक्ष साविये डीसिल्वा यांनी सांगितले की, माशांची आवक कमी असल्यामुळे बोटींनी मे महिन्याच्या सुऊवातीलाच समुद्रात जाणे थांबवले होते. आपल्या बोटींवर सध्या देखभालीचे काम सुरू आहे. 90 टक्क्मयांहून अधिक मासेमारी बोटींनी आपले कामकाज आधीच गुंडाळले आहे असे डीसिल्वा म्हणाले. दरम्यान, मासेमारीची कामे नियोजित वेळेपूर्वीच थांबल्यामुळे, नौकामालक आणि खलाशांनी आता पुढील मासेमारी हंगामाच्या तयारीचा एक भाग म्हणून, आपल्या नौकांच्या दुऊस्ती आणि देखभालीच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. ट्रॉलरवर काम करणाऱ्या बऱ्याच कामगारांनी परतीचा रस्ता धरला आहे. हे कामगार आता मासेमारी हंगाम सुरू होण्याच्या सात-आठ दिवस अगोदर पुन्हा गोव्यात येतील.
मच्छीमारी करणाऱ्या बोटी होणार जप्त,परवानेदेखील रद्द करण्याचा इशारा
गोव्यात मासेमारी बंदी सुरु झाली असून ती आता 60 दिवस म्हणजे दोन महिने कायम राहणार आहे. या बंदी काळात ज्या बोटी मासेमारी करतील, त्या जप्त करण्यात येणार असून त्यांचा परवाना रद्द होणार असल्याचा इशारा मच्छीमारी खात्याने दिला आहे. या संदर्भात एक परिपत्रक काढण्यात आले असून ते सर्व मच्छीमार सोसायटींना पाठवण्यात आले आहे. त्यातून हा इशारा देण्यात आला आहे. मासेमारी बंदी काळात सर्व बोटींचे परवाने निलंबित होणार असून जर त्या बोटी बंदी मोडून मासेमारी करताना सापडल्या तर त्यांचे परवाने आपोआप रद्द होतील, अशी समज त्या परिपत्रकातून देण्यात आली आहे. मासेमारी बंदी 1 जून ते 31 जुलै 2026 असे एकूण दोन महिने राहणार आहे. बंदीच्या काळात जेटी (बोटीचे धक्के) जिल्हा न्यायदंडाधिकारी ताब्यात घेणार असून त्या सीलबंद केल्या जाणार आहेत, असे मच्छीमार खाते संचालिका शर्मिला मोंतेरो यांनी परिपत्रकातून कळवले आहे. परवाना रद्द झाल्यास त्याचे नूतनीकरण होणार नाही तसेच सरकारी योजनेतून होणारा लाभही कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहे. त्याशिवाय मच्छीमारी बोट जप्त केली जाणार असल्याचे परिपत्रकातून कळवण्यात आले आहे. गोव्याच्या समुद्रात नियमितपणे गस्त घालून पाळत ठेवण्यात येणार आहे.