For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजय यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट“ला मच्छिमारांचा विरोध

06:22 AM Sep 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
विजय यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट“ला मच्छिमारांचा विरोध
Advertisement

तामिळनाडूत आंदोलनाची घोषणा : उपजीविका संकटात येणार असल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था, चेन्नई

मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारकडून प्रस्तावित सचिवालय प्रकल्पावरून अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. यात द्रमुक आणि अण्णाद्रमुक यासारख्या प्रमुख विरोधी पक्षांसोबत डाव्या आणि व्हीसीके या सत्तारुढ आघाडीत सामील पक्षही आहेत. पट्टिनापक्कम येथील मच्छिमार समुदायाने विजय सरकारच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.

Advertisement

मच्छिमार समुदाय या भागात राहत असून मासेमारीचे काम करतोय. एमजीआरनंतर मुख्यमंत्री विजय हे मच्छिमार समुदायाचे मित्र ठरतील असे आम्हाला वाटले होते. परंतु येथे सचिवालय कॉम्प्लेक्स निर्माण करण्याचा त्यांचा निर्णय आमच्यासाठी मोठा झटका असल्याचा आरोप मच्छिमार समुदायाने केला आहे. सचिवालयासाठी प्रस्तावित 25 एकर जमिनीवर मच्छिमारांसाठी घरे उभारावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

या ठिकाणी आमची उपजीविका आहे, आम्ही कुठे जाणार? आमच्या चिंता मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा असल्याचे मच्छिमार समुदायाच्या नेत्यांनी म्हटले आहे. पट्टिनापक्कम भागातील 10 हून अधिक वसाहतींमधील मच्छिमारांनी यापूर्वीच प्रकल्पाला विरोध करत सरकारी आदेश मागे घेण्याची विनंती केली होती. याचबरोबर अनेक गावांच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे हा आदेश मागे घेतला न गेल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मच्छिमारांच्या मुख्य चिंता

तामिळनाडू सरकारने पट्टिनापक्कम येथे सुमारे 1200 कोटी रुपयांच्या निधीतून एक नवे सचिवालय कॉम्प्लेक्स निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा प्रकल्प मच्छिमारांच्या उपजीविकेवर प्रतिकूल प्रभाव पाडू शकतो तसेच या भागात राहणाऱ्या सुमारे 20 हजार शालेय मुलांचे जीवन प्रभावित होईल असा दावा आंदोलन करत आहेत. या भागात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असल्याने यापूर्वीच मासेविक्रीवर अनेक बंधनांना तोंड द्यावे लागतेय. अशास्थितीत येथे सचिवालय कॉम्प्लेक्स निर्माण करण्यात आल्यास पूर्ण समुदाय, त्याची उपजीविका आणखी प्रभावित होईल. मच्छिमारांना पोलीस आणि मत्स्य विभागाकडून दबावाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.