बेकायदा मासेमारी रोखा, अन्यथा समुद्रात उपोषण
मच्छीमार नेते दामोदर तोडणकर यांचा इशारा
मालवण/प्रतिनिधी
मासेमारी हंगामात येथील समुद्रात होणाऱ्या घुसखोरीबाबत स्थानिक मच्छीमार सातत्याने मत्स्यव्यवसाय खात्याचे लक्ष वेधत आहेत. मात्र, अद्यापही येथील मत्स्य व्यवसाय विभागास अत्याधुनिक स्पीड गस्तीनौका उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे शासनाला जर परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखणे जमत नसेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे. डोळ्यासमोर मासळीची होणारी लूट आम्ही बघू शकत नाही. त्यामुळे आता आम्हाला समुद्रात उतरून उपोषण छेडावे लागेल . येत्या पंधरा दिवसात याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा उभारू असा इशारा मच्छीमार नेते दामोदर तोडणकर यांनी दिला आहे.मासेमारी बंदी कालावधीनंतर १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामास सुरुवात झाली आहे. समुद्रात वादळसदृश्य परिस्थिती असल्याने पूर्ण क्षमतेने अद्यापही मासेमारीला सुरवात झालेली नाही. याच संधीचा फायदा उठवीत सोमवारपासून परर येथील समुद्रात दहा वावाच्या आत मलपीतील शेकडो ट्रॉलर्सनी घुसखोरी करत मासळीची लूट करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक मच्छीमारांच्या डोळ्यादेखत ही मासळीची लूट होत असल्याने मच्छीमार संतप्त बनले आहेत. मच्छीमारांच्यावतीने तोडणकर यांनी शासनास निर्वाणीचा इशारा देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.