समुद्रात 438 दिवस भरकटला मच्छिमार
पाऊस, मासे अन् कासवांच्या आधारे वाचवले प्राण; समुद्रात अन्न-पाण्याविना संघर्ष, सहकाऱ्याचा मृत्यू, तरीही जगण्याची आशा सोडली नाही
समुद्राच्या चारही बाजूंना अथांग पाणी, डोक्यावर कडक ऊन, पिण्यासाठी पाणी नाही आणि मदतीची कोणतीही शक्यता नाही... अशा भयावह परिस्थितीत एका मच्छिमाराने तब्बल 438 दिवस समुद्रात घालवले. एल साल्वाडोरचा रहिवासी असलेल्या सल्वाडोर अल्वारेंगा याने प्रशांत महासागरात मृत्यूशी झुंज देत अखेर किनारा गाठला, त्याच्या जगण्याच्या संघर्षाची ही कहाणी आजही थक्क करणारी आहे.
वादळामुळे बदलले आयुष्य
नोव्हेंबर 2012 मध्ये अल्वारेंगा मेक्सिकोच्या किनाऱ्यावरून मासेमारीसाठी आपल्या तरुण सहकाऱ्यासोबत निघाला होता. मात्र समुद्रात अचानक आलेल्या वादळामुळे त्यांची छोटी नौका भरकटली. नौकेत पाणी शिरू लागले. इंजिन बंद पडले आणि संपर्काची साधनेही निकामी झाली. समुद्राच्या प्रवाहासोबत त्यांची नौका दूरवर वाहत गेली. किनाऱ्यावर परतण्याचा मार्गच उरला नाही.
पावसाचे पाणी अन समुद्री जीव आधार
समुद्रात अडकलेल्या दोघांसमोर सर्वात मोठे आव्हान होते ते अन्न आणि पाण्याचे. पाऊस पडल्यानंतर त्यांनी पावसाचे पाणी गोळा करून प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवले. भूक भागवण्यासाठी मासे, समुद्री कासव आणि पक्षी यांचा आधार घेतला. काही वेळा कासवांचे मांस अन् रक्ताचाही वापर करावा लागला. कडक ऊन, रात्रीची थंडी, प्रचंड लाटा आणि सततची तहान यांचा सामना करत त्यांनी दिवस काढले. जगण्याची इच्छा कायम ठेवण्यासाठी अल्वारेंगा आपल्या सहकाऱ्याला धीर देत असे.
सहकाऱ्याचा मृत्यू, संघर्ष अधिक कठीण
दीर्घकाळ उपासमार आणि अशक्तपणामुळे त्याचा सहकारी इझेकिएल कॉर्डोबा याची प्रकृती खालावत गेली. अखेर त्याचा मृत्यू झाला. या घटनेने अल्वारेंगाही मानसिकदृष्ट्या खचला. आता अथांग समुद्रात तो पूर्णपणे एकटा पडला होता. तरीही त्याने जगण्याची आशा सोडली नाही. समुद्रात दिसणाऱ्या जहाजांकडून मदतीची अपेक्षा ठेवत तो किनाऱ्याच्या शोधात राहिला. आपल्या मुलीला पुन्हा भेटण्याची इच्छा त्याला जगण्यासाठी बळ देत होती.
डोळ्यांसमोरून गेले जहाज
समुद्रात अनेक महिने उलटले असताना अल्वारेंगा यांना दूर अंतरावर एक मोठे मालवाहू जहाज दिसले. जहाज हळूहळू त्यांच्या नौकेच्या नजीक आले. आता आपले जीवन वाचेल असे त्यांना वाटेल. परंतु जहाज इतके नजीक आले की नौका चिरडली जाईल अशी भीती त्यांना वाटली. अल्वारेंगा यांनी जहाजावरील लोकांना पाहून जोरात ओरडून मदत करा, मी येथे असे सांगण्याचा प्रयत्न केला. जहाजावरील तीन जणांनी त्यांच्या दिशेने पाहिले आणि हातही हलवला. परंतु त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. जहाज न थांबताच निघून गेले. ही घटना अल्वारेंगा यांच्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती.
438 दिवसांनंतर दिसला जमिनीचा तुकडा
30 जानेवारी 2014 रोजी अल्वारेंगाला समुद्रात तरंगणारे नारळ आणि आकाशात उडणारे समुद्री पक्षी दिसले. त्यानंतर त्याला दूरवर जमिनीचा तुकडा दिसला, तो मार्शल बेटसमुहातील एबॉन अटोलचा किनारा होता. समुद्रात तब्बल 438 दिवस घालवल्यानंतर त्याने अखेर जमिनीवर पाऊल ठेवले. किनाऱ्यावरील स्थानिक दाम्पत्याने त्याला पाहू मदत केली. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि तो आपल्या मायदेशी परतला. मुलीला पुन्हा भेटल्यानंतर त्याच्या भावनांचा बांध फुटला.
जगण्याच्या इच्छेची विलक्षण कहाणी
भूक, तहान, वादळ, एकाकीपणा आणि सहकाऱ्याच्या मृत्यूचे दु:ख अशा अनेक संकटांवर मात करत अल्वारेंगाने जगण्याची लढाई जिंकली. प्रतिकूल परिस्थितीतही आशा आणि जगण्याची जिद्द माणसाला किती मोठे बळ देऊ शकते, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे.