मत्स्य विभागाची नौका तपासणी...शुद्ध धूळफेकच
आठवडाभरापूर्वी देवगड येथे भर समुद्रात परराज्यातील खलाशाने तांडेलाचा अत्यंत क्रूरपणे खून करून पर्ससीन ट्रॉलर पेटवून दिला. या घटनेने कोकण किनारपट्टी अक्षरश: हादरून गेली. या घटनेनंतर लगेचच मत्स्य विभागाने अन्य मासेमारी नौकांवरील तांडेल, परप्रांतीय खलाशी आणि नौकांच्या विविध परवान्यांची कागदोपत्री पडताळणी मोहीम हाती घेतली. पण, ही नौका तपासणी म्हणजे शुद्ध धूळफेक असून त्यात मत्स्य विभागाचेच हसे होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया किनारपट्टीवर उमटत आहेत.
सोमवार 28 ऑक्टोबर रोजी देवगड समुद्रात क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या परप्रांतीय खलाशाने नौकेवरील तांडेलाचा खून करून नौका पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली होती. संबंधित खलाशी हा छत्तीसगडमधील आहे. त्याने किरकोळ वादाचा राग मनात ठेऊन तांडेलाच्या मानेवर मासे कापण्याच्या सुरीने सपासप वार करून त्याचे डोके धडावेगळे केले. अत्यंत क्रूरपणे हे कृत्य केल्यानंतर संशयिताने तांडेलाचे डोके हातात पकडून ते बोटीच्या समोरील भागावर आणून ठेवले आणि त्यानंतर नौका पेटवून दिली. नौकेवरील अन्य खलाशांनी भीतीपोटी समुद्रात उड्या मारल्या अन् नजीकच्या नौकांचा आसरा घेतला. या नौकेवर एक वयोवृद्ध खलाशीसुद्धा होता. त्याला पोहता येत नव्हते. पण संशयिताचे क्रौर्य पाहून त्यानेसुद्धा समुद्रात उडी घेतली.
अखेर नौकेला आगीने पूर्णपणे वेढल्यानंतर संशयिताने समुद्रात उडी मारली अन् तो पर्ससीन नेट ट्रॉलरसोबत असलेल्या डिंगीत (छोटी नौका) जाऊन बसला. सागर सुरक्षा रक्षक दलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ‘अप्सरा’ या स्पीडबोटद्वारे त्याला ताब्यात घेऊन बंदरात आणले. या घटनेनंतर मत्स्य विभागाकडून आता नौकांवरील खलाशी व कागदपत्रांची पडताळणी सुरू झाल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले. ही पडताळणी आवश्यक असली तरी मत्स्य विभागाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा अनेक शंका उपस्थित होत आहेत.
कोकणातील पारंपरिक मच्छीमारांना ही एक प्रकारची शुद्ध धूळफेक वाटते आहे. हे प्रकरण जेवढ्या गांभिर्याने घ्यायला हवे तसे मत्स्य विभागाकडून घेतले जात नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. याचे कारण म्हणजे, राज्यात जिल्हानिहाय नोंदणीकृत मासेमारी नौका किती आहेत, त्या कुठल्या प्रकारची मासेमारी करतात, त्यांच्या परवान्याची मुदत किती आहे, या बाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असते. पर्ससीन नेट मासेमारीच्या बाबतीत सांगायचे तर किती पर्ससीन नौका राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात मासेमारी करण्यास पात्र आहेत, याची बंदरनिहाय इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे असते. तरीपण अधिकृतपेक्षा मोठ्या संख्येने अनधिकृत पर्ससीन नौका स्थानिक बंदरांमधून मासेमारीसाठी बाहेर पडतात आणि मासेमारी करून बंदरात येत असतात. परिस्थिती इतकी बिकट असेल तर मत्स्य विभागाच्या नौका तपासणीवर कितपत विश्वास ठेवायचा, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविकच आहे.
किंबहुना मत्स्य विभागाची नौका तपासणी हा आता चेष्टेचा विषय बनला असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. नियमबाह्या पद्धतीने पर्ससीन जाळी भरलेल्या अनेक नौका राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात आज कार्यरत आहेत. एलईडी मासेमारीसाठी भले मोठे जनरेटर्स समुद्रात नेण्यासाठी मोठ्या ट्रॉलर्सचा वापर सुरू आहे. हे ट्रॉलर्स पलीकडच्या अरब देशांमधून आपल्याकडे येत नाहीत. ते आपल्या स्थानिक बंदरांमधूनच समुद्रात जातात. मग या एलईडी ट्रॉलर्स आणि अवैध पर्ससीन नौका मत्स्य विभागाच्या नजरेतून निसटतात कशा? परराज्यातून मासेमारीसाठी येणारा प्रत्येक खलाशी ज्या नौकेवर मासेमारीस जातोय, त्या नौकेकडे अधिकृत परवाना आहे किंवा नाही, याची पडताळणी सुरुवातीलाच होत नाही का? असे अनेक सवाल आहेत जे मत्स्य विभागाला अडचणीचे ठरू शकतात, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात देवगड तालुक्यातील कुणकेश्वर समुद्रकिनारी रापण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रापण ही कोकणातील पारंपरिक मासेमारी पद्धती आहे. या मासेमारीला सुमारे 300 वर्षांचा इतिहास असल्याचे सांगितले जाते.
रापण ही एक केवळ मासेमारी पद्धत नसून ती एक संस्कृती आहे, असे म्हटले जाते. एक गाव किंवा वाडीतील लोक या रापणीशी जोडलेले असतात. अलिखित सहकारी तत्त्वानुसार वर्षानुवर्षे ही मासेमारी सुरू आहे. गेल्या 20 वर्षात देशी-विदेशी पर्यटकांसाठी रापण हा एक आकर्षणाचा आणि अभ्यासाचा विषय बनला आहे. आजच्या आधुनिक मासेमारीच्या युगातही रापणीचे महत्त्व कायम आहे. ही पद्धती टिकावी, तिचे जतन व्हावे, या उद्देशाने कुणकेश्वर येथे गेल्या वर्षीपासून रापण महोत्सव सुरू करण्यात आला. यावर्षीसुद्धा येथे रापण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
गतवर्षी रापण महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कुणकेश्वरसमोरील समुद्रात पर्ससीन नौकांनी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. तेव्हा साडेबाराच्या आत 15 ते 20 पर्ससीन नौका मासेमारी करत होत्या. पारंपरिक रापणीचे जाळे किनाऱ्यापासून साधारण दोन कि.मी. दूर समुद्रात टाकले जाते. महोत्सवानिमित्त रापणीचे जाळे टाकायला गेलेल्या मच्छीमारांच्या जवळच मोठे पर्ससीन ट्रॉलर्स मासेमारी करत होते. हे दृश्य पाहून तेव्हा किनाऱ्यावरील मच्छीमार आणि पर्यटकांनाही प्रश्न पडला की, नक्की रापण महोत्सव आहे की पर्ससीन महोत्सव? स्थानिक प्रशासन रापणीच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या पर्ससीन ट्रॉलर्सना रोखत का नाही? असाही सवाल तेव्हा विचारला गेला होता. ही सर्व उदाहरणे पाहिल्यावर मत्स्य विभागाच्या नौका तपासणीला किती गांभीर्याने घ्यायचे, हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो.
मत्स्य विभागाने जर अत्यंत काटेकोरपणे नौका तपासणी केली तर एकही अवैध मासेमारी नौका समुद्रात जाणार नाही. त्यामुळे मत्स्य विभागाची नौका तपासणी म्हणजे केवळ दिखाऊपणा असून त्यातून देशाची सागरी सुरक्षा आणि शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने ठोस असे काहीच साध्य होत नसल्याची खंत मच्छीमार व्यक्त करताना दिसतात. मत्स्य विभागाबाबतचे हे एकूणच जनमत पाहता मत्स्य विभागाने आता आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
महेंद्र पराडकर