For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मासा : अनन्यतेचे प्रतीक

06:48 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
मासा   अनन्यतेचे प्रतीक
Advertisement

मासा हा जलचर प्राणी सर्वसामान्यांच्या दृष्टीस पडण्याचे तसे काही कारण नाही. त्याचा वास फक्त पाण्यात आहे. ओढे, नदी, जलाशय, समुद्र असलेल्या ठिकाणी मासे दिसतात. तेही मुद्दाम जाऊन बघितले तरच. अन्यथा मासा हा माणसाच्या कक्षेत येत नाही. तरीही मासा माणसाच्या आयुष्यात या ना त्या कारणाने सतत डोकावतो. साहित्यात, पुराणात, अध्यात्मात, कलेमध्ये तो ठळकपणे आपले अस्तित्व दाखवतो.

Advertisement

एका पिढीचे लहानपण ‘मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ डर जाती, बाहर निकालो मर जाती’ या गाण्याशिवाय पुढे गेलेच नाही. मासा हा प्रतीक म्हणून मानला गेला आहे. तो भाग्याचे प्रतीक असे मानल्यामुळे त्याचे चित्र पूर्वीच्या काळी भिंतींवर हमखास असायचे. भारतातील अनेक राजघराण्यांचे मासा हे राजचिन्ह होते. तो मीन म्हणजे मत्स्यस्वरूपात राशीचक्रात सामावला आहे. तो शिवाचेही प्रतीक आहे. शिव मत्स्यरूपात मणिकुट पर्वतावर विराजमान आहे असे कलिकापुराण म्हणते. मासा हे जननशक्तीचे प्रतीक आहे म्हणून भारतात काही ठिकाणी नवदांपत्य नदीवर जाऊन माशांची पूजा करतात व त्याच्या खवल्यांनी त्यांचे कपाळ शृंगारतात. मासा समृद्धी आणि सुदैव यांचेही प्रतीक आहे. तीर्थक्षेत्रावर गेल्यावर लोक रामनाम लिहिलेल्या कागदात पिठाचे गोळे करून ते माशांना खाऊ घालतात. त्यामुळे मोक्ष मिळतो, अशी समजूत आहे.

संत तुकाराम महाराजांचा विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करणारा ‘सुंदर ते ध्यान’ हा अप्रतिम अभंग आहे. त्यात पंढरीनाथाचे वर्णन करताना महाराज म्हणतात, ‘मकरकुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित’.. विठोबाच्या कानाजवळ मासोळ्या आहेत कारण मासा हे श्रवणाचे प्रतीक आहे. श्रवणामधली एकाग्रता मकराच्या रूपाने विठोबाजवळ दाखवली आहे. पंढरीचा विठोबा हा नादब्रह्म आहे. तो भक्तांच्या नामघोषात रंगलेला आहे. त्याला नामस्मरणाचे नादानुसंधान असलेला भक्त प्रिय आहे म्हणून त्याने कानामध्ये मकरकुंडले धारण केली आहेत. मकरसंक्रांतीला श्रवणाचे दानाइतके महत्त्व आहे. मासा हा अनन्यतेचे प्रतीक आहे म्हणूनही विठोबाने त्याला कानापाशी स्थान दिले. मासा हा पाण्याशी अनन्य आहे. पाण्याबाहेर पडला तर तडफडून प्राण देतो. मासे विकणारे लोक माशांवर ते ताजे राहण्यासाठी खूप पाणी शिंपडतात. मासे शिजायलाही जास्त पाणी लागते. मासे खाणारे नेहमीपेक्षा खूप पाणी पितात. मासे शिजवलेले भांडे स्वच्छ करण्यासाठी देखील जास्त पाणी लागते. याचा अर्थ जिवंतपणे आणि मरणानंतर मासा पाण्याशी अनन्य राहतो. विठोबाला परमेश्वराशी अनन्य असणारे भक्त आवडतात. विठ्ठलाच्या भेटीसाठी तळमळताना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी’.

Advertisement

सत्यव्रत मनू महाराजांची कथा श्रीमद्भागवतामध्ये आहे. महाराज मनू तर्पण करीत असताना एक मासा त्यांच्या ओंजळीत आला तेव्हा त्यांनी त्याला पाण्यात सोडून दिले तेव्हा तो मत्स्य म्हणाला, महाराज मी आपल्याला शरण आलो आहे. माझे रक्षण करा. तेव्हा त्यांनी त्याला आपल्या कमंडलूमध्ये ठेवून दिले. माशांनी जेव्हा विशाल रूप धारण केले तेव्हा त्याला कमंडलू पुरेना. हा कोणी साधारण मत्स्य नसून मत्स्यनारायणाचा अवतार आहे हे मनू महाराजांनी जाणले. डोंगरे महाराज म्हणतात, वास्तविक मासा हा वृत्तीचे प्रतीक आहे. माझेपण व अहंकार सोडून वृत्ती विशाल करावी. परंतु जोपर्यंत वृत्ती ब्रह्माकार होत नाही तोपर्यंत मनाला शांती मिळत नाही. मनाला मत्स्याची उपमा दिली आहे. मन कृष्णरूप झाले की आनंदाची प्राप्ती होते. सृष्टी प्रलयामध्ये बुडाली तेव्हा मत्स्यनारायणाने महाराज मनूचे रक्षण केले. सत्यनिष्ठ जीव म्हणजेच मनू आहे. कितीही प्रलय जीवनात येवो, जो मत्स्यनारायणाला शरण जातो तो नष्ट होत नाही

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी जंगलातील तळ्यामधले एक निरीक्षण नोंदवले आहे. उन्हाळ्यात जेव्हा तळ्यातील पाणी आटायला लागते तेव्हा वाघुर व शिंगूर नावाचे मासे एकजुटीने आड बांधतात. आपल्या लहानग्या तोंडाने व शेपटीने चिखलाचा गुळगुळीत केलेला असा हा मोठा रांजण असतो. हवा आत जाण्यासाठी एक भोक ठेवून बाकी सर्व बाजूने तो बंद करतात. त्यात पाणी असते व पाऊस पडेपर्यंत ते मासे एकमेकांना चिकटून त्या पाण्यात जिवंत राहतात. एवढासा मासा इतका मजबूत आड बांधतो की त्यावरून बैलगाडी गेली तरी तो मोडत नाही. तळ्यातील पाणी आटल्यावर मृत्यू टाळण्यासाठी माशांनी केलेली एकजूट माणसाने शिकण्यासारखी आहे. माशांचा आणखी एक गुण माणसाने घेण्यासारखा आहे, तो म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा. जपान देशात कोईनोबोरी हा सण साजरा करतात. ज्यांना मुले आहेत ते पालक त्या दिवशी मोठ्या उंच बांबूला रंगीबेरंगी कापडांचे तयार केलेले मोठे मोठे मासे बांधतात. ही काठी घराच्या छतावर उभी करतात. कापडी माशांच्या पोकळीत हवा शिरली की हे रंगीबेरंगी मासे हवेत पोहू लागतात. हे मासे म्हणजे बलवान व पाण्यात राहून प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या कार्प माशांची प्रतिकृती असते. आपली मुले देखील या माशांसारखी सशक्त आणि संकटांना न घाबरता आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ व्हावीत हा त्यामागचा उद्देश आहे.

श्री दत्तप्रभूंनी चोवीस गुरूंमध्ये माशाला गुरू केले. पाण्यात राहणारा चपळ मासा माणसाच्या गळाला लागतो. कशामुळे? तर जिभेमुळे. रसनेच्या आसक्तीला तो भुलतो आणि मरतो. एरवी सागरात माशाला खाद्य भरपूर असते तरीही माणसाने लोखंडाच्या गळाला लावलेले खाद्य खाण्यास मासे प्रवृत्त होतात आणि प्राणास मुकतात. त्याप्रमाणे माणूसही जिभेच्या स्वादात अडकून पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात, ‘एक जीभ जिंकली की सर्व विषयांना जिंकल्यासारखेच आहे.’ मत्स्याला गुरू करून दत्तप्रभूंनी बोध घेतला की रसासक्ती सुटल्याशिवाय शाश्वत सुखाची आशासुद्धा करता येत नाही. रसासक्ती ही परमात्मा दर्शनानंतर सुटते.

मासा आणि मानव यांच्यात समांतर सूत्र आहे ते सागराचे. मासा सागरात पोहतो आणि माणूस भवसागरात. माणूस नावाचा धीवर माशांसाठी सागरात गळ टाकतो आणि काळ नावाचा धीवर माणसासाठी भवसागरात गळ टाकून बसलेला असतो. त्याच्या गळाला लागलेला माणूस क्षणार्धात मृत्युमुखी पडतो. तिथे कुणाचे काहीही चालत नाही. माणसाच्या जगात प्रत्यक्षात फारसा न येणारा मासा माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळवून बसला आहे.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.