For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तब्बल 20 वर्षांनी मच्छीमार्केट गजबजले

02:01 PM Mar 06, 2025 IST | Radhika Patil
तब्बल 20 वर्षांनी मच्छीमार्केट गजबजले
Advertisement

चिपळूण : 

Advertisement

तब्बल 20 वर्षानंतर शहरातील मच्छीमार्केट बुधवारी गजबजले. नगर परिषदेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर सर्वच विक्रेते एका छताखाली गेले आहेत. यामुळे ग्राहकही आनंदले आहेत. कारवाईदरम्यान जप्त साहित्य दंड वसूल करीत परत करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे काही विक्रेत्यांनी कै. अण्णासाहेब खेडेकर क्रिडा संकुलात बस्तान मांडण्यास सुरूवात केली आहे.

20 वर्षापूर्वी शहरातील गुहागरनाका परिसरात असलेले जुने मटण-मच्छीमार्केट तोडून त्या जागी नवे मार्केट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र इतकी वर्षे झाली तरी ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून काही मोजकेच विक्रेते येथे अनधिकृतपणे व्यवसाय करीत आहेत. तर अनेकांनी बाजारपूल, भोगाळे, काविळतळी, कोलेखाजण, पॉवरहाऊस, पंचायत समिती परिसर आदी भागात व्यवसाय सुरू केले. मात्र मच्छीचे टाकाऊ अवशेष तेथेच टाकले जात असल्याने दुर्गंधी पसरत होती. याची ओरड झाल्यानंतर नगर परिषद तकलादू कारवाई करून मोकळे होत होते. मात्र काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शहरातील सर्वच अतिक्रमणावर धडक कारवाई केली. त्यात हजारो रुपयांची मच्छी व ट्रे आदी साहित्यही जप्त केले. त्यामुळे आता पुन्हा उघड्यावर व्यवसाय करता येणार नाही, हे लक्षात आल्याने मंगळवारी विक्रेत्यांनी मुख्याधिकारी भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांची भेट घेत आम्ही सर्वजण मच्छीमार्केटमध्ये व्यवसाय करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्याला प्रशासनाने हिरवा कंदील दाखवल्याने बुधवारपासून एकाच छताखाली हा व्यवसाय सुरू झाला आहे

Advertisement

  • साहित्य परत देण्यास सुरुवात

अतिक्रमणावर कारवाई करताना ज्यांनी सूचनांकडे दुर्लक्ष केले, त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे असे व्यावसायिक दररोज नगर परिषदेत येऊन आमचे साहित्य परत द्या, अशी मागणी करीत होते. त्यामुळे आता दंड वसूल करून हे साहित्य परत करण्यास सुरुवात झाली आहे.

  • क्रीडा संकुलात बस्तान

एकीकडे कारवाई व गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने 90 टक्के व्यावसायिक पर्यायी जागा शोधत असतानाच काही व्यावसायिक मात्र कारवाई झालेल्या ठिकाणीच पुन्हा येण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहींनी तर बुधवारी कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलाच्या इमारतीखाली मोकळ्या जागेत बस्तान मांडले आहे. त्यामुळे यांनाच वेगळा न्याय का, असा सवाल अन्य व्यावसायिकांमधून उपस्थित होत आहे. आम्हांलाही तातडीने पर्यायी जागा देण्याची मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.