तूरडाळीपेक्षा बांगडे स्वस्त!
कडधान्ये-डाळींच्या किमतीत भरमसाट वाढ : सर्वसामान्य हैराण
बेळगाव : बाजारात डाळी कडधान्याच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. तूरडाळ तर 180 रुपये किलो झाली आहे. त्यामुळे काहीजण अंडी, चिकन आणि बांगड्यांना पसंती देऊ लागले आहेत. शिवाय तूरडाळीपेक्षा बांगडे स्वस्त असे बोलले जात आहे. फिश मार्केटमध्ये बांगड्यांची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे डाळीपेक्षा बांगड्यावरच अधिक ताव मारला जात आहे. हळूहळू वातावरणात बदल होत असून थंडीला सुरुवात होत आहे. त्यामुळे चिकन, अंडी आणि बांगडे खरेदीला वेग येऊ लागला आहे. अंडी 6 रुपयाला 1, चिकन 240 रुपये तर बांगडे 120 ते 150 रुपये किलो प्रमाणे विक्री होऊ लागली आहे. सद्यस्थितीत बांगड्यांची आवक अधिक होऊ लागली आहे.
त्यातच दिवाळी सणानंतर आता खवय्यांचा मासांहारीकडे कल वाढू लागला आहे. बाजारात खाद्य तेल, किराणा बाजार आणि कडधान्य डाळींच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्याबरोबर भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. गवारासह इतर सर्वच भाज्या प्रतिकिलो 80 रुपयाच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करणे अशक्य होऊ लागले आहे. कडधान्यामध्ये प्रतिकिलो मसूर 90 रुपये, वाटाणे 90 रु., मटार 160 रु., मटकी 90 रु., हरभरा 90 रु., मूगडाळ 100 रु., हरभराडाळ 100 रु., मसूरडाळ 90 रु. असा कडधान्य आणि डाळींचा दर आहे. वाढलेल्या या दरामुळे नागरिक अंडी, चिकन, बांगड्यांना अधिक पसंती देत आहेत. तूरडाळ 180 रु. किलो झाल्याने तूरडाळीपेक्षा बांगडे बरे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. वाढत्या जीवनावश्यक गोष्टींमुळे जगणे असहय्य होऊ लागले आहे.