कळंबा तलावातील मासे मृत्यूमुखी
पाणी प्रदूषण जलचरांच्या जीवावर : प्रशासनाचे अक्ष्यम दूर्लक्ष : वाढते प्रदूषण रोखणार कोण? ग्रामस्थांचा संतप्त सवाल
कळंबा / सागर पाटील :
कळंबा गावासह शहरातील काही भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या कळंबा तलावामध्ये मृत मासे आढळून आले आहे. तलावाचे वाढते पाणी प्रदूषण आता जलचरांच्या जीवावर उठले आहे, तरीही या प्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणेकडुन अक्ष्यम दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे येथील वाढते पाणी प्रदूषण रोखणार कोण? असा संतप्त सवाल कळंबा ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. तलावाचे पाणी प्रदूषित होत असतानाही तलावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बांधकामे, हॉटेल, मंगल कार्यालय यांची संख्या वाढतच असल्यान प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पर्यावरण प्रेमी, नागरिकांमधून शंका उपस्थित केली जात असून संताप व्यक्त केला जात आहे.
शहरालगत असणारा कळंबा तलाव या नैसर्गिकरित्या शुद्ध असणाऱ्या जलसाठ्याचे महत्त्व वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. आपत्तीकाळात उपयोगी पडणाऱ्या या तलावाचे महत्त्व शहराला वेढलेल्या महापूरा दरम्यान समोर आले आहे. त्यामुळे शहराच्या दृष्टीने हा तलाव शुद्ध राहणे फार गरजेचे आहे. तलाव शुद्ध रहावा यासाठी संस्थान काळात येथील बालिंगा आणि कळंबा हि दोन गावे स्थलांतरीत करण्यात आली. मात्र सध्या त्याच ठिकाणी नागरीवस्तीसह व्यवसाय वाढत असल्याने तलावाचा शुद्ध जलसाठा धोक्यात आला आहे. तलावाच्या पाणी प्रदूषणास सुरुवात झाली असूनही महापालिका, कळंबा ग्रामपंचायत याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
तलावातील मासे मृत
कळंबा तलावाचा सांडवा, तलावात असणारा मनोरा आणि झाडातील गणपतीच्या बाजूस मासे मृत झाल्याचे दिसून आले आहे. या तीन ठिकाणी तलावाच्या काठावर मोठयाप्रमाणात मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. मासे मृत झाल्याने येथे पाण्यालाही दुर्गधी सुटली आहे. तरीही अद्याप या प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. यामुळे मासे नेमके कशामुळे मृत झाले याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
सुशोभिकरणाचा गाजावाजा, प्रदूषणाकडे दूर्लक्ष
विधानसभा निवडणुकीचे नुकतेच मतदान झाले. यावेळी प्रचारा दरम्यान कळंबा तलावाचा सुशोभिकरणाचा आवर्जून उल्लेख केला. त्यामुळे निवडणुकीत सुशोभिकरणाचा गाजावाजा झाला. पण नेत्यांचेही तलावाच्या मुळ दूखण्याकडे दूर्लक्ष होत आहे. केवळ सुशोभिकरण न करता तलावाचे प्रदूषण रोखण्यासाठीही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
प्रदूषणाला वेळीच आवर घालणे गरजेचे
कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात हॉटेल, मंगल कार्यालय, फार्म हाऊस यांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर अन्य विविध व्यवसायही वाढत आहे. तसेच कात्यायनी पार्क येथे नागरी वस्ती वाढत आहे. यासर्वांच्या माध्यमातून निर्माण होणारे सांडपाणी थेट तलावात मिसळणाऱ्या नाल्यांमध्ये सोडले जात आहे. नाले, ओढ्यातून हे सांडपाणी थेट तलावात मिसळत आहे. तसेच पाणलोट क्षेत्रात प्लॉटींग प्रोजेक्टचीही संख्या वाढत आहे. भविष्यात येथे नागरी वस्ती वाढल्यास हे देखिल सांडपाणी तलावातच मिसळणार आहे. त्यामुळे प्राथमिक टप्प्यातच सांडपाणी निर्गतीकरणबाबत उपाय योजना करुन पाणी प्रदूषणाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. अन्यथा कळंबा तलावाचा रंकाळा होणार हे निश्चित आहे.
पक्षी मृत्युमुखी
कळंबा तलाव परिसरामध्ये माशांबरोबर पक्षी ही मृत्यूमुखी पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे पाणी किती प्रदूषीत आहे ते आढळून येत आहे. प्रशासनाने जलसाठ्याची तपासणी करून नागरिकांना वाढत्या प्रदूषणाबाबत माहिती देण्याची गरज आहे अन्यथा गावात साथीच्या आजार पसरण्याची भीती आहे.