For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सियाचीन ऑपरेशनल पोस्टवर प्रथमच महिला वैद्यकीय अधिकारी

06:27 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
सियाचीन ऑपरेशनल पोस्टवर प्रथमच महिला वैद्यकीय अधिकारी
Advertisement

कॅप्टन फातिमा वसीम यांच्यावर जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ लडाख

सियाचीन ग्लेशियरमधील लष्कराच्या ऑपरेशनल पोस्टवर प्रथमच एक महिला वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यात आली आहे. ही जबाबदारी कॅप्टन फातिमा वसीम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांची पोस्टिंग 15 हजार 200 फूट उंचीवर असेल. लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने सोमवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली.

Advertisement

फायर अँड फ्युरी कॉर्प्सने यासंबंधी एक व्हिडीओ जारी केला असून त्यात फातिमा सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असल्याचे दिसून येत आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सला अधिकृतपणे 14 वी कॉर्प्स म्हणतात. याचे मुख्यालय लेह येथे आहे. ते चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात आहेत. तसेच ते सियाचीन ग्लेशियरचे संरक्षण करतात. यापूर्वी 5 डिसेंबर 2023 रोजी स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या कॅप्टन गीतिका कौल या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी बनल्या होत्या. 15,600 फूट उंचीवर असलेल्या सियाचीन युद्धभूमीवर त्यांना तैनात करण्यात आले आहे. कॅप्टन गीतिका यांनी सैन्याच्या तैनातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत देशासाठी प्रत्येक कर्तव्य पार पाडणार असल्याचे तिने सांगितले. ती आपला जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करत आहे.

सियाचीन ग्लेशियरमध्ये 1984 पासून सैन्य तैनात

सियाचीन ग्लेशियर भारत-पाकिस्तान सीमेजवळ सुमारे 78 किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. त्याच्या एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला अक्साई चीन आहे. 1984 मध्ये पाकिस्तानी सैन्य हा भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाल्यानंतर 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय लष्कराने आपल्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सची विशेष तुकडी या भागात तैनात केली होती.

Advertisement
Tags :

.