For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरात जायंट्सचा पहिला विजय,

06:21 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरात जायंट्सचा पहिला विजय
Advertisement

आरसीबीवर 19 धावांनी मात, सामनावीर बेथ मुनी, वुलव्हार्ट यांची अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सामनावीर बेथ मुनी व लॉरा वुलव्हार्ट यांनी नोंदवलेल्या अर्धशतकांसह शतकी भागीदारीच्या बळावर गुजरात जायंट्सने या वर्षीच्या महिला प्रिमियर लीगमध्ये सलग चार पराभवानंतर पहिला विजय नोंदवताना आरसीबीला 19 धावांनी हरविले.

Advertisement

वुलव्हार्टने जोरदार फटकेबाजी करीत 45 चेंडूत 76 धावा फटकावल्या तर कर्णधार बेथ मुनीने आक्रमक टोलेबाजी करीत 51 चेंडूत नाबाद 85 धावा तडकावल्या. या दोघींनी 13 षटकांत 140 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला. वुलव्हार्टने आपल्या खेळीत 13 चौकार तर मुनीने 12 चौकार, एक षटकार मारला. या दोघींच्या खेळामुळे गुजरात जायंट्सने 20 षटकांत 5 बाद 199 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर आरसीबीच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पण त्यांना त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता न आल्याने त्यांना 20 षटकांत 8 बाद 180 धावांपर्यंतच मजल मारता आली.

विशेष म्हणजे या सामन्यात गुजरातचे तीन व आरसीबीचे 4 असे एकूण 7 फलंदाज धावचीत झाल्या. आरसीबीची कर्णधार स्मृती मानधनाने (16 चेंडूत 24) सावध सुरुवात केली. नंतर तिने नवोदित स्पिनर तनुजा कंवरवर हल्ला चढवित दोन षटकार व एक चौकार ठोकला. अॅश्ले गार्डनरने एका फसव्या चेंडूवर स्मृतीला  पायचीत करीत तिची खेळी संपुष्टात आणली. तिची सलामीची साथीदार एस. मेघनाने 13 चेंडूत 4 धावा करीत चेंडू वाया घालवले. एलीस पेरी (23 चेंडूत 24) व सोफी डिव्हाइन (16 चेंडूत 23) यांनी 23 चेंडूत 32 धावांची भर घातल्यानंतर आरसीबीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण डिव्हाइनला तनुजा कंवरने त्रिफळाचीत केले. कॅथरीन ब्राईसने पेरीला मुनीकरवी झेलबाद केल्यानंतर आरसीबीच्या आशा संपुष्टात आल्या. रिचा घोषने 21 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार मारत 30 धावा जमवून थोडाफार प्रतिकार केला तर जॉर्जिया वेअरहॅमने अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी करीत 22 चेंडूत 48 धावा फटकावल्या. पण यावेळपर्यंत बराच उशीर झाला होता.

तत्पूर्वी, आरसीबीच्या गोलंदाजांना अचूक टप्पा राखता न आल्याने मुनी व वुलव्हार्ट यांनी जबरदस्त फटकेबाजी करीत दमदार सलामी दिली. पॉवरप्लेमध्ये दोघींनी सोफी डिव्हाइन व रेणुका ठाकुर यांच्यावर हल्ला करीत तब्बल 59 धावा झोडपल्या. लेगस्पिनर आशा शोभना (1 षटकात 11 धावा), डावखुरी स्पिनर एकता बिश्त (3 षटकांत 31) यांची गोलंदाजीही त्यांनी फोडून काढली. वुलव्हार्ट धावचीत झाल्यानंतर मुनीने फोबे लिचफिल्डसमवेत 33 चेंडूत 52 धावा जोडल्या. मुनीला नॉनस्ट्रायकर एंडला राहिल्याने शेवटच्या 10 चेंडूत केवळ 7 धावा जमविल्या. या अवधीत त्यांचे चार फलंदाज बाद झाल्याने गुजरातला 200 चा टप्पा गाठता आला नाही. अॅश्ले गार्डनरने 23 धावांत 2 बळी मिळविले तर ब्राईस व तनुजा यांनी एकेक बळी टिपले. आज गुरुवारी मुंबई इंडियन्स व यूपी वॉरियर्स यांच्यात लढत होणार आहे.

संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स महिला 20 षटकांत 5 बाद 199 : वुलव्हार्ट 45 चेंडूत 76, बेथ मुनी 51 चेंडूत नाबाद 85, लिचफिल्ड 17 चेंडूत 18, अवांतर 17, सोफी मॉलीनॉ 1-32, वेअरहॅम 1-36. आरसीबी 20 षटकांत 8 बाद 180 : स्मृती मानधना 16 चेंडूत 24, पेरी 23 चेंडूत 24, डिव्हाइन 16 चेंडूत 23, रिचा घोष 21 चेंडूत 30, वेअरहॅम 22 चेंडूत 48, बिश्त 12, अवांतर 11, गार्डनर 2-23, ब्राईस 1-26, तनुजा कंवर 1-43.

Advertisement
Tags :

.