आधी फटके, मग लग्न
आपला देश विविध परंपरा आणि चालीरीतींनी भरलेला आहे. प्रत्येक समाजाच्या भिन्न मान्यता आहेत. आपल्या देशात समाजही खूप असल्याने परंपरांध्येही वैविध्य बरेच असणे स्वाभाविक आहे. बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये ओराँव नामक वनवासी समाजातील एक परंपरा आश्चर्याने थक्क करुन सोडणारी आहे. या समाजात विवाह सभारंभ साजरा करण्यापूर्वी वधू आणि वर यांच्याकडील मंडळी एकमेकांना चाबकाने फोडून काढतात. दोन्ही बाजूंच्या वऱ्हाडी मंडळींनी हे फटके सहन केल्यानंतरच विवाह समारंभास प्रारंभ केला जातो. सर्वात आश्चर्य म्हणजे हा फटक्यांचा कार्यक्रम विवाहानंतर दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये सौहार्दाचे संबंध रहावेत यासाठी केला जातो. फटके देण्यासाठी चाबूक दोऱ्यांपासून केले जातात. ते दोन्ही बाजूंची मंडळी त्यांच्या त्यांच्या घरीच बनवितात. या चाबूक समारंभात वधू आणि वर यांच्या घरातील सर्व मंडळी सहभागी होतात. त्यांच्या उपस्थितीवरुन कुटुंबातील ऐक्य किती आहे, हे ठरत असते. त्यामुळे सर्व नातेवाईक उपस्थित असतात.
विवाह सभारंभातील ‘सिंदूरदान’ या महत्वाच्या कार्यक्रमाआधी हा कोडे किंवा चाबूक मारण्याचा कार्यक्रम केला जातो. ‘सिंदूरदान’ कार्यक्रमाच्या आधी आणखी एक असाच अनोखा कार्यक्रम केला जातो. वधूच्या कुटुंबातील महिला ‘साल’ वृक्षाच्या पानांमध्ये हळद ठेवून ती पाने छतावर फेकतात. वराच्या कुटुंबातील महिला त्यांना रोखायचे असते. या रोखण्याच्या वेळीच एकमेकांना कोडे मारले जातात. हा कार्यक्रम झाल्यानंतरच वधू आणि वर विवाहमंडपात येतात. त्यानतंर विवाह समारंभ रीतसर साजरा केला जातो. भोजनावळी होऊन कार्यक्रम संपतो.