हुक्केरीसाठी आधी स्थगिती, नंतर उठवली
डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट : आज सर्व मतदारसंघांसाठी होणार निवडणूक
प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बँकेसाठी रविवार दि. 19 रोजी मतदान होणार आहे. मात्र यामध्ये अनेक ट्विस्ट येत असून उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने रविवारी होणाऱ्या निवडणुकीत हुक्केरी मतदारसंघासाठी स्थगिती देऊन उर्वरित सर्व मतदारसंघांची निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. मात्र उच्च न्यायालयाने स्थगिती उठवत हुक्केरी मतदारसंघासाठीही रविवारी मतदान घेण्याचा आदेश जारी केला आहे.
हुक्केरी मतदारसंघाच्या निवडणुकीवर स्थगिती देण्यासाठी धारवाड खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. याची सुनावणी करत न्यायालयाने रविवार 19 रोजी डीसीसीच्या संदर्भात हुक्केरी तालुक्यातील विविध पीकेपीएसद्वारे प्रतिनिधीत्व केलेल्या मतदारसंघाची निवडणूक संदर्भ-4 मधील अधिसूचनेनुसार पुढे ढकलण्याचा आदेश शुक्रवारी दिला होता. यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी हुक्केरी मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देऊन उर्वरित मतदारसंघांची निवडणूक पूर्ववतपणे होणार असल्याची अधिसूचना काढली होती.
मात्र धारवाड खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत याविरोधात उच्च न्यायालयात शनिवारी याचिका दाखल करण्यात आली होती. याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने धारवाड खंडपीठाने हुक्केरी मतदारसंघासाठी निवडणूक पुढे ढकलण्याचा आदेश रद्द केला. त्याचबरोबर हुक्केरी मतदारसंघाची जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांसह रविवारी होणाऱ्या निवडणुकीत मतदान घेण्याचा आदेशही जारी केला आहे. याची कार्यवाही करत निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
स्थगिती उठविल्याने हुक्केरी मतदारसंघासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत रमेश कत्ती व राजेंद्र पाटील यांच्यात लढत होत आहे. हुक्केरी मतदारसंघात काँटे की टक्कर असून संपूर्ण राज्याच्या हुक्केरी मतदारसंघाकडे नजरा लागल्या आहेत. हुक्केरी तालुका वीज संघाच्या निवडणुकीत रमेश कत्ती यांच्या पॅनेलने एकतर्फी विजय मिळविला होता. आता पुन्हा डीसीसी बँकेसाठी निवडणूक होत असून स्वत: रमेश कत्ती निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात राजेंद्र पाटील टक्कर देणार आहेत. यामुळे आता हुक्केरी मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.