काश्मीरमध्ये हंगामातील पहिली हिमवृष्टी
वृत्तसंस्था/ श्रीनगर/जम्मू
गेले अनेक दिवस उष्णतेच्या चटक्मयात असलेल्या काश्मीर खोऱ्यात हवामानात बदल झाला आहे. येथील अफ्रावत, गुरेझ, राजदान टॉप, सिंथन टॉप आणि गुलमर्गच्या उंच पर्वतीय भागात हंगामातील पहिला हिमवर्षाव झाला. तर श्रीनगरसह सखल भागात जोरदार पाऊस झाला. जम्मू विभागात सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे तापमानात घट झाली आहे. काही ठिकाणी सकाळचे वादळ व मुसळधार पावसामुळे भातपीक जमिनीवर पडले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत अधूनमधून हलका पाऊस पडू शकतो. काही दिवसांपासून खोऱ्यातील तापमान वाढू लागले होते. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे गुऊवारी पहाटे गुलमर्गसह उंच डोंगराळ भागात पाऊस झाला. तर उंच पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरूच होती. काही भागात 2-3 सेंमी जाडीची बर्फाची चादर पसरली होती. हिमवृष्टीचा परिणाम हवेतही दिसून येत होता.